पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

अत्याचार, बीभत्स, ओंगळ, हिडीस अनाचार करीत असला, तर तो लोकसत्तेला पात्र आहे असें म्हणतां घेईल काय ? मग प्रथमपासूनच या पशूची दखल घ्यावयाची व त्याला जेरबंद करावयाचें असें सोव्हिएट नेत्यांनी ठरविले तर त्यांचा अमेरिका कोणत्या तोंडाने धिक्कार करणार ? मूळ लोकशाहीच्या मूल्यांचीच येथे मी अवहेलना करीत आहे असें कोणी समजूं नये. पण ही मूल्ये दण्डसत्तेच्या मार्गाने प्राप्त करून घेतां येतात असें सोव्हिएट रशिया म्हणत असला तर, तीं जवळ नसतांना लोकशाहीच्या घोषणा करून, मानवांतल्या पशूला नंगा नाच घालण्याचे स्वातंत्र्य देऊन राष्ट्रनाश करून घेणान्या लोकांना त्याच्या म्हणण्याचा अधिक्षेप कसा करता येईल ? भ्रमाने, अज्ञानाने किंवा उच्च तत्वांच्या कैफाने लोकवादी लोक तसें करीत राहिले तर त्यांचे समाज दण्डसत्तांपुढे नामोहरम झाल्यावांचून राहणार नाहीत.
 आणि विवेचनाच्या अखेरीस मला स्वजनांना हेंच सांगावयाचे आहे. उदात्त तत्वांच्या कैफांत राहण्याची आपल्याला हौस आहे. प्रचंड योजना, उच्च घोषणा यांचे आपल्याला व्यसनच आहे आणि त्या बेहोषींत त्या उदात्त तत्त्वांचा प्रत्यक्ष आचार होतो की नाही याचा काडीमात्र विचार आपण करीत नाही. त्यामुळे थोर उद्गार आणि हीन आचार हे आपले लक्षण होऊन बसले आहे. आचार्य विनोबा, जयप्रकाश नारायण हे शांतिसेनेचा रोज घोष करतात, पण चीनच्या आघाडीवर तसला एकहि सैनिक त्यांनी धाडलेला नाही, आणि स्वतः आत्मिक सामथ्यनि संपन्न असून स्वतः आपणहि तिकडे गेले नाहीत. स्वदेशांतले, आसमंतांतल्यासारखे अत्याचार थांबविण्यासाठी सुद्धा त्यांनी शांतिसेना उभारलेली नाही. घोषणांचा मात्र त्यांना कधी कंटाळा नाही. थोडयाफार फरकाने काँग्रेसचे व इतर राजकीय पक्षांचें हेंच लक्षण आहे. राष्ट्रनिष्ठा ही फार मोठी शक्ति आहे. परंपराभक्ति आणि शत्रुद्वेष या प्रेरणांमुळे समाजाचा उत्कर्ष होतो. पण आज जगांतले मानवतावादी पंडित राष्ट्रनिष्ठेचा अधिक्षेप करतात, विश्व राष्ट्राची भाषा बोलतात. असल्या उदात्त तत्त्वांचे काय करावयाचें हें जगांतले व्यवहारी शास्ते चांगलें जाणतात. पण भारतीयांना हें जाणतां येणार नाही. कारण मानवता, विश्वराष्ट्र या शब्दांच्या उच्चाराबरोबर त्यांना कैफ चढलाच पाहिजे आणि त्यांना भेटायला ते अंतराळांत गेलेच पाहिजेत.