पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २६३

आहे. दण्डसत्तेमुळे सोव्हिएट जनता अगदी गुलामी वृत्तीची होऊन गेली आहे, तिच्या ठायीं स्वतंत्र कर्तृत्वाची प्रेरणा नाही, तिचा बुद्धिविकास होणें शक्य नाही हा दुसरा भ्रम प्रचलित माहे. आपण हें ध्यानांत ठेवले पाहिजे की, या दण्डसत्ता आपल्याकडच्या जुन्या संस्थानाप्रमाणे सरंजामी सत्ता नाहीत. जनतेचें सर्व प्रकारचें कर्तृत्व उदयास आणावयाचें अशी या सत्तांची प्रतिज्ञा आहे आणि ती त्यांनी खरी करून दाखविली आहे. बुद्धिविकास व बलविकास या दृष्टीने त्यांनी श्रेष्ठ लोकसत्तांवरहि मात केली आहे. रशियन शास्त्रज्ञ आज विज्ञानाच्या तात्त्विक आणि व्यावहारिक अशा सर्व शाखांत जगाच्या आघाडीवर आहेत हें सर्वश्रुतच आहे. ऑलिंपिक सामन्यांतील रशियनांचा विक्रम पाहिला म्हणजे बलविकासांतहि लवकरच ते मात करणार हे निश्चित आहे असें दिसेल. म्हणजे या सत्तांनी केवळ लष्करी सामर्थ्याचा विकास केला आहे असें नाही, तर त्या आपल्या राष्ट्राचा सर्वांगीण विकास करीत आहेत. सध्याच्या काळांत केवळ लष्करी सामर्थ्याचा विकास करणे शक्यच नाही हें पहिल्या प्रकरणांत स्पष्ट केलेच आहे.
 या दण्डसत्तांनी मानवतेची मूल्यें पायदळी तुडविलीं आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे. तो आरोप अक्षरशः खरा आहे. पण यासाठी त्यांचा अधिक्षेप करण्यापूर्वी सध्याच्या लोकसत्तांनी गेल्या शतकांत काय केलें आहे त्याचा आठव आपण करावा, आणि त्यावांचून एखाद्या देशाने प्रगति केली आहे काय, संस्कृतीची वाढ केली आहे काय, हे पाहण्यासाठी इतिहास चाळीत बसावें. गेल्या शतकांतलें सोडून द्या. आज अमेरिकेत मानवतेच्या मूल्यांची किती किंमत आहे तेंहि आपण पाहावें. तेथली बालगुन्हेगारी, प्रौढ गुन्हेगारी, संघटित दरवडेखोरी, जुगारी, मादक व्यसनें, वेश्याव्यवसाय, कुटुंब विध्वंस आणि तेथले लाचार राजकारणी यांचा विचार आपण करावा. तेथली अनीति, भ्रष्टता, विषमता ही अत्यंत भयावह पातळीला गेली आहे, असे गेल्या दहा वर्षांतल्या या प्रकारांचें संशोधन करण्यासाठी नेमलेल्या पन्नास समित्यांनी तरी सांगितलें आहे; आणि हें सर्व पराकाष्ठेची समृद्धि असतांना ! अमेरिकेंत असें आहे म्हणून सोव्हिएट रशियांतील प्रकार समर्थनीय आहे असें मला मुळीच म्हणावयाचें नाही. पण इतक्या वर्षांचे लोकशाहीचे संस्कार झाल्यानंतरहि मानवांतला पशु इतका बेताल होत असला, लोकशाहीतील स्वातंत्र्याचा दुष्ट उपयोग करून तो अनन्वित