पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २६५

मग प्रत्यक्ष आचरणांत कमालीची जातीयता, प्रांतीयता, कमालीचा पक्षीय स्वार्थ या कर्दमांत आपण कसे रुतून बसलो आहों हें त्यांच्या ध्यानी येणार नाही. हें ध्यानी येण्याची ऐपतच त्यांच्या ठायीं उरत नाही. अशी आपली राष्ट्रीय प्रकृति होऊन बसली आहे. तिच्यांत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले पाहिजे, आपण वास्तववादी झाले पाहिजे; आपण अंतराळांत न भटकता भूमीवर उतरलें पाहिजे.
 तसे होतांच मानव कसा आहे, त्याच्यांत स्वार्थ किती प्रभावी असतो, त्याच्या हीन वृत्ति थोड़ा अवसर मिळतांच कशा जाग्या होतात, त्यांतून त्याला वर उचलावयाचें तर ध्येयवादाचा उपयोग किती होईल, कोणाच्या ध्येयवादाचा प्रभाव जास्त पडेल, राष्ट्रनिष्ठा, मानवता, विश्वकल्याण, सर्वभूतहित यांपैकी कशाचें आवाहन जास्त प्रबळ ठरेल, हें सर्व मग आपल्याला सहज कळून येईल. त्याचप्रमाणे दण्ड, नियंत्रण, शिक्षा यांचेहि समाजपरिवर्तनांत स्थान कोणते याचाहि अवगम आपल्याला होईल. आणि मग सध्याचें अत्यंत भ्रान्त, प्रमादपूरित, विपरीत तत्त्वज्ञान टांकून देऊन राष्ट्रीय उत्कर्षासाठी अवश्य असें वास्तववादी जगांतलें, राष्ट्रनिष्ठेचें, मर्यादित लोकसत्तेचें, मध्यम मार्गाचं, राष्ट्रीय स्वार्थाची दक्षतेने जपणूक करणारे तत्त्वज्ञान स्वीकारण्याची सुबुद्धि आपल्याला प्राप्त होईल. तसें होतांच समाजोन्नतीच्या महाप्रेरणा येथे कार्य करूं लागतील आणि सध्या विशीर्ण, विगलित, विकल होऊन गेलेला आपला समाज संघटित होईल, ध्येयवादी होईल, संपन्न होईल, बलाढ्य होईल. लोकशाही येथे खऱ्या अर्थाने अवतीर्ण होईल, आणि खऱ्या अर्थाने पूर्ण विकसित झालेल्या, स्वयंतेजाने प्रकाशमान होणाऱ्या, विवेकी, निग्रही, संयमी लोकशाहीपुढे कोणतीहि दण्डसत्ता क्षणमात्र टिकाव धरू शकणार नाही हें ब्रह्मदेवानेच लिहून ठेविलें आहे.

+ + +