पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

वृत्ति, परिवर्तनक्षमता हे सद्गुण त्यांनी जनतेत रुजविले. त्यामुळे तीं राष्ट्रे आज बलाढ्य झाली आहेत आणि लोकशाही पेलण्यास समर्थ होत आहेत. नव्या पिढीने असा मध्यममार्ग स्वीकारला तरच भारताचा उत्कर्ष होईल. नाही तर आपल्या लोकशाहीचा तर बळी पडेलच, पण दण्डसत्तेच्या आक्रमणाला बळी पडून आपले स्वातंत्र्यहि नष्ट होईल, आणि अशा रीतीने लोकशाही मूल्यें समाजांत नसतांना लोकशाही प्रस्थापित केल्याचें प्रायश्चित्त आपल्याला भोगावें लागेल.
 'लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान' या विषयाचें विवेचन संपले. येथवर मांडलेल्या विचारांचा निष्कर्ष सांगून आता समारोप करावयाचा आहे.

निष्कर्ष

 पहिली गोष्ट आपण अशी ध्यानांत ठेवली पाहिजे की, आपल्या मनांत दण्डसत्तेचा कितीहि तिटकारा असला तरी तिच्याविषयीच्या भ्रान्त कल्पना आपण करून घेतां कामा नये. तिच्या स्वरूपाविषयी सम्यक् ज्ञान नसलें तर तिचे आव्हान आपल्याला कधीहि स्वीकारतां येणार नाही. चीन-रशियाच्या दण्डसत्तांविषयी पहिला भ्रम असा प्रसृत झालेला आहे की, त्या देशांतील जनता तेथील शास्त्यांच्या विरोधी आहे. पारतंत्र्यांतल्या जनतेला परकी शासनाविषयी जसा द्वेष असतो, त्याच्याविरुद्ध बंड करून उठण्यास ती जशी नेहमी उत्सुक असते तशीच ही जनता आहे असा समज सर्व देशांत पसरलेला आहे. युजीन लिऑन्स या अमेरिकन पत्रपंडिताने 'अवर सीक्रेट अलाइज्' या नांवाचा एक ग्रंथ लिहून हें मत हिरीरीने मांडले आहे. त्याच्या मतें रशियन जनता हीच खरी आपली- लोकसत्तावाद्यांची- मित्र आहे. सोव्हिएट सरकारविषयी तिच्या मनांत जळता द्वेष आहे, आणि कोट्यवधि रशियन लोक बंडाला उत्सुक झालेले आहेत. १९५३ साली त्याने हा ग्रंथ लिहिला. पण गेल्या सात वर्षात तसा कांही एक प्रकार घडलेला नाही. कारण मुळांतच तसें कांही नाही. वॉल्टर लिपमन हा प्रसिद्ध अमेरिकन ग्रंथकार १९५८ च्या अखेरीस रशियांत गेला होता. परत आल्यावर 'दि कम्युनिस्ट वर्ल्ड अँड अवर्स' हें पुस्तक लिहून त्यांत त्याने रशियाविषयीची आपली मतें मांडली आहेत. 'रशियांत प्रतिक्रान्ति होईल ही अपेक्षा अगदी वेडेपणाची आहे' असें त्याने स्पष्टपणें म्हटलें