पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

जाहीरपणे आपल्या पापाची कबुली देऊन माफी मागावी लागते. नाही तर इहलोक सोडावा लागतो. पण असे असूनहि चीनमध्ये कोठे दुफळी झालेली नाही किंवा मध्यवर्ती सत्ता दुबळी झाल्याचें कसलेंहि लक्षण तेथे दिसत नाही.

राजकीय प्रबुद्धता
 याचें प्रमुख कारण म्हणजे नवचीनने चिनी जनतेच्या ठायीं निर्माण केलेली राष्ट्रनिष्ठा हे होय. आज चीनमध्ये ६५ कोटि लोक जागृत झाले आहेत म्हणजेच राजकीय दृष्टीने प्रबुद्ध झाले आहेत. चीन व रशिया येथे मार्क्सच्या तत्त्वान्वयें क्रान्ति घडली व त्याच्या सिद्धान्तानुसारच पुढील काळात आपण समाजरचना केली असें तेथील नेते सांगतात. पण आपण एक गोष्ट ध्यानांत ठेवली पाहिजे की, या देशांतील प्रगतीचा मार्क्सवादाशी अर्थाअर्थी कसलाही संबंध नाही. आज मार्क्स रशियांत अवतरला तर त्याला गोळीच घातली जाईल असें ट्रॉट्स्की मागे म्हणाला होता, तें आजहि खरें आहे. सर्व जगाचा इतिहास हा वर्गविग्रहाचा इतिहास आहे असे मार्क्सचे मत आहे. 'पण रशियाचा इतिहास हा वर्गविग्रहाचा इतिहास नाही,' असें रशियांत सध्या प्रचलित असलेल्या शालेय इतिहासांत पहिलेच वाक्य आहे. तेंच राष्ट्रनिष्ठेविषयी. मार्क्सने राष्ट्रवादाला अत्यंत तुच्छ लेखिलें आहे. त्याच्या मतें कामगारांना मातृभूमि नाही, पितृभूमि नाही. धर्माभिमान, राष्ट्राभिमान, वंशाभिमान या त्याच्या मतें सर्व अफूच्या गोळ्या आहेत. पण या दण्डसत्तांकित देशांतील कम्युनिस्ट नेत्यांनी लवकरच हें जाणलें की, जनतेला धुंद, बेहोश करून टाकण्यास, खरी प्रेरणा देण्यास, यातली कोणती तरी गोळी अवश्य आहे. रशियन नेत्यांनी प्रारंभी थोडी आंतरराष्ट्रीयतेची उपासना चालविली होती; पण माओच्या कम्युनिस्ट पक्षाने हा भ्रम कधीच अंगीकारला नाही. प्रारंभापासूनच तत्त्वज्ञानपूर्वक त्याने जागतिक कामगार संघटनेचें उच्च तत्त्व वाऱ्यावर सोडून दिले आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेला आवाहन करून चिनी जनतेला संघटित केलें.

रागद्वेषांना चेतना
 स्वराष्ट्राचा गौरव म्हणजे इतर राष्ट्रांचा, निदान पक्षीं शत्रुराष्ट्रांचा द्वेष हें समीकरण ठरलेलें आहे. अज्ञानी, दरिद्री, दैववादी, पुराणयुगांत मनाने