पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

एका विचारसरणीचा वारस आहे. ती नष्ट झाल्यावांचून ब्रिटनच्या लोकशाहीचा उत्कर्ष व्हावयाचा नाही." सध्याच्या नेत्यांच्याबद्दल हाच विचार भारतीयांनी केला पाहिजे. हे सर्व लोक देशभक्त होते, राष्ट्रकार्यासाठी यांनी आपला देह एके काळी झिजविला होता यांत शंका नाही, पण मागील एक दोन प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे अत्यंत भ्रान्त असे तत्त्वज्ञान ते उराशी धरून बसल्यामुळे भारताचा अधःपात होत आहे, नाश होत आहे. तो टाळून भारताची लोकशाही यशस्वी करणें हें नेत्यांच्या नव्या पिढीचे कर्तव्य आहे.
 आपण भारतीय जास्त वास्तववादी, जास्त व्यवहारी झालो तरच चालू असलेल्या जागतिक संघर्षात आपला निभाव लागेल. अत्यंत उच्च तत्त्वांच्या आहारी जाऊन व्यवहारशून्य व्हावयाचें आणि आत्मघात करून घ्यावयाचा हा आपल्या रक्तांत भिनलेला दोष आपण समूळ नष्ट केला पाहिजे. उदात्त विचार आणि हीन आचार हें आपलें लक्षणच होऊन बसले आहे. अंतर्मुख होऊन, आत्मनिरीक्षण करून आपण किती अवास्तव, अव्यवहारी झालों आहो हे आपण जाणून घेतलें तर आपले मार्गक्रमण सुकर होईल, आणि संपूर्ण परिणत अशी लोकशाही येथे एकदम अवतरणे अशक्य आहे हे आपल्या ध्यानी येईल. नेत्यांची नवी पिढी उदयाला आली तर तिला मध्यम मार्गच स्वीकारावा लागेल. चीन- रशिया यांच्याप्रमाणे दण्डसत्तेचा आपल्याला आश्रय करावा लागेल असें वाटत नाही. पण ब्रिटन अमेरिकेप्रमाणे पूर्ण लोकशाही आपल्याला झेपेल हेहि शक्य नाही. याचे कारण एकच की, लोकशाही मूल्ये आपल्या समाजांत रुजलेली नाहीत. बहुसंख्य काँग्रेसजन पंचवीस तीस वर्षे महात्माजींच्या सहवासांत स्वातंत्र्यसंग्रामाच्या आघाडीवर होते, पण त्यांच्या ठायीं सुद्धा लोकशाही वृत्ति रुजूं शकली नाही. सत्ताधिष्ठित होतांच तेहि भ्रष्ट झाले, हें कठोर सत्य भारतीयांनी ध्यानी घेतलें पाहिजे. समाजवादी, प्रजासमाजवादी इ. पक्षांची हीच स्थिति आहे. स्वार्थ, दुही, गटबाजी, जातीयता या दुर्गुणांत ते रेसभरहि कमी नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनांत प्रजासमाजवादी लोकांच्या हातीं कोठे कोठे स्थानिक सत्ता आली होती, तेवढ्या अल्प अवधीत त्यांनी जे दिवे लावले ते पाहून संपूर्ण लोकशाहीचा अंगीकार करण्यापूर्वी आपण दहा वेळां विचार केला पाहिजे हे कोणाच्याहि ध्यानांत येईल. भारतीय जनता, काँग्रेसला शह देईल असा, अखिल भारतीय पक्ष निर्माण करू शकत नाही, यांतच आपल्या लोकशाहीचें