पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २५९

लोकशाही म्हणतात. दण्ड करून ती न्यायालयाने लोकांना शिकविणें याला दण्डसत्ता म्हणतात, आणि मुलाच्या अपराधासाठी पित्याला दण्ड हें तर लोकशाहीच्या उदार तत्वांत कोठेच बसणार नाही. तो रानटीपणा होय. पण समाजरक्षणासाठी, मुलांना सुधारण्यासाठी अमेरिकेने त्याचा आश्रय केला.

मध्यम मार्ग

 लोकसत्ताकांक्षी भारताने अमेरिकेतील या सर्व घटनांचा आणि त्यासंबंधी तेथील विचारवंतांनी प्रकट केलेल्या विचारांचा बारकाईने परामर्श घेतला पाहिजे. समृद्धि ही लोकशाहीला अत्यंत अवश्य हे खरें; समृद्धीवांचून लोकशाही कधीहि शक्य होणार नाही. पण उच्च नैतिक मूल्ये नसतील, लोकशाहीला अवश्य त्या विवेक संयमादि गुणांनी समाज संपन्न नसेल, तर समृद्धि असूनहि समाजाचा अधःपात टळत नाही. हीं नैतिक मूल्यें त्यागी, चारित्र्यसंपन्न, निःस्पृह, निःस्वार्थी नेतेच समाजांत निर्माण करूं शकतात. दुर्दैव असे की, सत्ताप्राप्तीनंतरच्या काळांत भारतांतून हें चारित्र्य हळूहळू लोप पावत चाललें आणि आता तें नाहीसेंच झाले आहे. अशा स्थितीत आपली लोकशाही यशस्वी होणें शक्य आहे काय, याचा प्रत्येक भारतीयाने विचार केला पाहिजे. सध्याच्या पद्धतीनेच भारताचा राज्यकारभार चालू राहिला तर आपली लोकसत्ता कोसळून पडेल, तिला राष्ट्राचें रक्षण करण्याचेहि सामर्थ्य राहणार नाही अशी मला भीति वाटते. आहे हा राज्यकारभार सुधारणें हा त्यावर उपाय आहे, असे सहजच मनांत येईल. पण त्याची स्वप्नांत सुद्धा आशा वाटत नाही. सध्याचे जे या देशाचे नेते आहेत, भाग्यविधाते आहेत, ते आता वृद्ध झाले आहेत. त्यांच्या जीवनाची, विचाराची, तत्त्वज्ञानाची व आचाराची पठडी ठरून गेली आहे. तीतून बाहेर पडून नवा मार्ग आखावा हें त्यांच्या शक्तीबाहेरचें आहे. तेव्हा नेत्यांची नवी पिढी भारतांत निर्माण झाली तरच आपले भवितव्य कांही बदलू शकेल. सध्याच्या नेत्यांच्या पिढीला वंदन करून, अत्यंत आदराने पण कठोर निश्चयाने यज्ञांतील अग्नीचें विसर्जन करतात तसे तिचें विसर्जन करण्याचें सामर्थ्य ज्यांच्या ठायी आहे असे तरुण नेतेच भारताचें भवितव्य घडवू शकतील. 'रिफ्लेक्शन्स् ऑन दि रेव्होल्यूशन ऑफ अवर ओन टाइम्स' या ग्रंथांत लास्कीने असेंच म्हटले आहे. "चर्चिलच्या विजयेच्छेबद्दल वाद नाही. ब्रिटनच्या विजयेच्छेचें तो प्रतीक आहे. पण तो एका तत्वज्ञानाचा,