पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

तमाशे बंद करून आपण तेथे अभ्यास, मेहनत, कष्ट यांची शिकवण देणें अवश्य आहे.
 सॅम्युएल लिबोविट्झ हे ब्रुकलिनच्या वरिष्ठ न्यायालयांतील एक ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. अमेरिकेतील बालगुन्हेगारीने त्यांचें मन हबकून गेलें आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांतील शेकडा १३ गुन्हे १८ वर्षांच्या आंतील मुलें करतात आणि खुनांपैकी शे. ९ खून या मुलांच्या हातून होतात. आज अनेक वर्षे ते या भयानक आपत्तीची मीमांसा करीत आहेत. त्यांच्या मतें या अनर्थांतून समाजाला मुक्त करावयाचें असेल तर एकच उपाय आहे. "कुटुंबामध्ये पिता हा पूर्वीप्रमाणे नियंता झाला पाहिजे." आज त्याचें हें स्थान नाहीसें झालें आहे. ते म्हणतात, आज्ञापालन हें घरांत आज राहिलेच नाही. मध्यमवर्गीय घरांत स्वच्छंदवादी मानसशास्त्राचें भूत शिरले आहे. (परमिसिव्ह सायकॉलजी) त्यामुळे नियंत्रण, बंधन असे राहिलेच नाही. मी सोळा वर्षांचा असतांना वडील सांगत असत की, रात्री साताच्या आंत घरी आले पाहिजे आणि मी येत असें. आज मुलगा किंवा मुलगी मध्यरात्रीं घरीं आली, आणि कुठे गेली होतीस, एवढें जरी वडिलांनी विचारलें, तरी तो रानटीपणा ठरतो. आता स्त्रियांना अधिकार आल्यामुळे त्यांनाहि मुलांचीच बाजू घ्यावीशी वाटते. अशा रीतीने पिता पदच्युत झाला आहे. त्यामुळे मुलांना वळण नाही, धाक नाही, भीति नाही आणि सर्व गुन्हेगारी यामुळे वाढली आहे. पिता नियंता झाला तर हा सर्व अनर्थ थांबेल. अमेरिकेतील मिचिगन संस्थानाने तर १९५३ साली 'पेरेंटल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्ट' असा कायदा करून मुलांच्या गुन्ह्यांसाठी मातापित्यांना दीडदोन हजार रुपयांपर्यंत दण्ड करण्याचें ठरविलें. त्याबरोबर बालगुन्हेगारीचे प्रमाण सपाट्याने कमी होऊं लागलें. त्याच्या आधी तेथे अगदी अनर्थ झाला होता. ज्यांनी हा प्रस्ताव मांडला ते सीनेटर हॅरोल्ड रायन यासंबंधी बोलतांना म्हणाले की, 'मातापित्यांना दण्ड बसूं लागला म्हणजे ते मुलांकडे जास्त लक्ष देतील, त्यांची जास्त काळजी घेतील असें मला वाटले, म्हणून हा कायदा केला आहे.' सुदैवाने त्यांचा अजमास खरा ठरला. याचा अर्थ काय होतो ? आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना वाममार्गी होऊं देतां कामा नये, ही माता-पित्यांची जबाबदारी त्यांना, अमेरिकेसारख्या प्रगत लोकसत्ताक राष्ट्रांत दण्ड करून शिकवावी लागली. स्वतःची जबाबदारी स्वतःहोऊन जाणणें याला