पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २५७

निर्भत्सना करूं नये, त्यांना कडक बोलू नये, त्यांचे लालन करावें या नव्या तत्त्वज्ञानावर त्यांत त्यांनी प्रखर टीका केली आहे. आपल्या शाळा म्हणजे केवळ उरूस आहेत, तमाशे (कार्निव्हल) आहेत असे ते म्हणतात, आणि पदोपदीं रशियांतील शिक्षणाशीं अमेरिकन शिक्षणाची तुलना करतात. अमेरिकेत बहुजनसमाजाला शिक्षण द्यावयाचें ठरतांच जनतेला वर आणण्याऐवजी शिक्षणाचा दर्जाच खाली आणला गेला आणि यामुळे समाजाचा अधःपात झाला असें ते म्हणतात. कडक शिस्त, नियंत्रण, कठोर बंधने, शासनें याऐवजी शाळांमध्ये सर्वत्र लाडीक, प्रेमळ, शिथिल, स्वैर वातावरण आले आहे. मुलांना गणित, फिजिक्स, परकी भाषा, प्राचीन भाषा नको असतात. ठीक आहे. त्याऐवजी त्यांना सोपे, गोड, त्यांना आवडणारे, त्यांच्या आहारांतले विषय विकल्प म्हणून द्या. सक्तीने पहिले विषय त्यांच्यावर लादून, चोपून त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा, हे धोरण युक्त नाही. सक्ती आणि लादणें हा रानटीपणा आहे. त्यांनी बालकाचा मनोविकास होत नाही. पण रशियांत मात्र तो होतो! स्लोअन म्हणतात, "आज रशियांत १ कोटी विद्यार्थी इंग्रजी शिकतात. पण अमेरिकेत रशियन भाषा शिकणारे विद्यार्थी जेमतेम ८ हजार आहेत." रशियांत शिक्षणाचा दर्जा नेत्यांनी खाली आणला नाही. विद्यार्थ्यांना निग्रह, कष्ट, कणखर वृत्ति, अखंड अभ्यास हें शिकवलें. ज्यांना वर जावयाचे आहे त्यांनी अमके विषय घेतलेच पाहिजेत अशी सक्ती केली. त्यामुळे सोव्हिएट रशियांत विद्येला जो मान आहे तो आज अमेरिकेत नाही. बहुजनांना शिक्षण देऊ नये असें विल्सन यांना मुळीच म्हणावयाचें नाही. शिक्षणाची पातळी कमी करूं नये असे त्यांचे म्हणणें आहे. नाहीतर बुद्धिमान् विद्यार्थ्यांना स्पर्धेचा अंकुश राहणार नाही, विद्येत रंग राहणार नाही आणि शिक्षण सगळे फिदफिदून जाईल असें त्यांना वाटतें. आज प्रत्येक विचारी अमेरिकनाच्या मनांत सोव्हिएट दण्डसत्तेने अमेरिकेच्या लोकसत्तेला दिलेल्या आव्हानाचा विचार अखंड जागा असतो. म्हणूनच लेखाच्या शेवटीं विल्सन म्हणतात की, शस्त्रनिर्मितीच्या व सामर्थ्याच्या स्पर्धेत शेवटी कोण विजयी होणार हे या दोन देशांतल्या शालेय शिक्षणावर अवलंबून आहे. जगांत शांततावाद किंवा सहजीवन यशस्वी व्हावयाचे की नाही हेहि येथल्या शाळांवरच अवलंबून आहे. तेव्हा शाळांतील उत्सव,
 लो. १७