पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

मानव, त्याच्यांतील दैवी अंश जागा केल्याने सुधारेल. प्रत्यक्ष परिणाम मात्र असा की, आपल्याला कसलीहि शिक्षा होत नाही हे ध्यानांत आल्यामुळे त्यांच्यांतला पशु फक्त जागा होतो, आणि तो जास्त जास्त हिंस्र अत्याचार करतो. कांही कारण नसतांना बागेंत उभ्या असलेल्या दहापांच मोटरींचीं रबरी चाके फोडणें, मुलींच्या वसतिगृहांत शंभरांच्या टोळीने जबरीने शिरून त्यांच्या चड्ड्या व चोळ्या पळविणें, वाटेंत दिसतील त्या घरांच्या काचा फोडणें, आगगाडीच्या डब्यांचा विध्वंस करणें, बसमधील गाद्या फाडून टाकणें, गमतीने दोनतीन झोपड्यांना आगी लावणें या गुन्ह्यांना अमेरिकेंत ऊत आला आहे. हे गुन्हे सर्व विद्यार्थी- बाल, तरुण विद्यार्थी करतात. यावर डॉ. अलेक्झांडर म्हणतात की, "आपल्या अमेरिकेत राहणीचें मान सर्वांत उच्च आहे आणि गुन्ह्यांचे प्रमाणहि सर्वात उच्च आहे?" या बाल-गुन्हेगारांत सधन घरांतलीं मुलेंहि पुष्कळ प्रमाणांत असतात. हल्ली आई काम करून पैसे मिळविते आणि राहणीचें मान वाढविते, पण त्याचबरोबर मातृहीन घरांत गुन्हेगारीचें प्रमाणहि वाढत आहे. यासंबंधी बोलतांना न्यायमूर्ति विल्फ्रेड वॉल्टमेड म्हणाले की, सध्या गुन्हेगारी वाढली आहे तिचें कारण शाळांतली नवी शिक्षणपद्धति हें आहे. मुलांचें लालन करावें, त्यांना स्वातंत्र्य द्यावें, त्यांचे मानसशास्त्र पाहावें हें आज अनेक वर्षे चाललें आहे. त्याचीं फळें आपण भोगतों आहोंत. शिस्त गेली व तेथे बालकाचा आत्माविष्कार आला. धर्म गेला व तेथे मानसशास्त्र आले. याने गुन्हेगारी वाढत चालली आहे. डॉ. अलेक्झांडर म्हणतात की, घरीं, शाळेत व समाजांत मुलांत अपप्रवृत्ति दिसतांच त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. स्टोव्हवर मुलाचा हात एकदा भाजला की, तो पुन्हा त्यावर हात ठेवणार नाही. तेवढी अक्कल त्याला असते. तेंच गुन्हेगारीविषयी खरे आहे. नव्या उपपत्तीमुळे आपण गुन्हेगारीला उत्तेजन देऊन समाजाचा नाश मात्र करीत आहोत.
 स्लोअन विल्सन हे शिक्षणाधिकारी आहेत. त्यांनी 'इट् इज् टाइम टु क्लोज अवर कार्निव्हल' या नांवाचा 'लाईफ' मध्ये एक लेख लिहिला आहे. (मार्च १९५८). मुलांचे लाड करावे, कौतुक करावें, त्यांच्या वृत्तीची मानसशास्त्रीय चिकित्सा करावी, शिक्षणाला मनोरंजनाचें रूप द्यावें, मुलांची