पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २५५

गुन्हेगाराने थांबले पाहिजे असा मात्र कायदा नाही. शे. ५० गुन्हेगार या रीतीने सुटून जातात. व्यक्तिस्वातंत्र्य, नागरिक हक्क यांच्या कल्पना अमेरिकेत इतक्या तीव्र झाल्या आहेत की, गुन्हेगाराविरुद्ध पुरावा गोळा करण्यासाठी पोलिसांनी त्यांचे टेलिफोन संदेश गुप्तपणे ऐकले तरी तेवढ्यावरून, गुन्हा सिद्ध झाला तरी. गुन्हेगार निर्दोष ठरतो. १९५० साली ज्युडिथ कॉपलन या बाईने एका रशियन हेराला कांही गुप्त कागदपत्रे दिली. तिचा पुन्हा न्यायालयांत सिद्ध झाला; पण पोलिसांनी वारंटावाचून तिला पकडलें होतें, आणि पाळत ठेवतांना तिचे टेलिफोन संदेश पकडले होते. त्यामुळे खालच्या कोर्टात तिला पंधरा वर्षांची शिक्षा झाली असूनहि वरिष्ठ कोर्टाने तिला सोडून दिलें, हें सांगून जॉन बार्करवेट हे कायद्याचे प्राध्यापक म्हणतात की, त्या दिवशी हा प्रकार पाहून मॉस्कोला हसू आलें असेल. राष्ट्राच्या संरक्षणाला धोका निर्माण झाला तरी अमेरिकन न्यायालये तंत्रनिष्ठ आहेत. केसाकेसाचें विच्छेदन करून, कायद्याचे अर्थ लावीत आहेत आणि फितूर, राष्ट्रद्रोही लोकांना निर्दोषी म्हणून सोडीत आहेत. लोकशाहीची मूल्यें दृढमूल न करतां लोकशाही स्वीकारली की, समाजाचा नाश ठरलेलाच आहे. जॉन बार्करवेट यांनी अमेरिकन न्यायपद्धतीची अतिशय निर्भर्त्सना केली आहे. ते म्हणतात, "आज या पद्धतीने गुन्हेगारांना संरक्षण मिळत आहे, उत्तेजन मिळत आहे आणि समाजाचें स्वास्थ्य, त्याचा योगक्षेम, त्याचें हित हे मात्र धोक्यांत आहे. जनतेने जागृत होऊन याला आळा घातला पाहिजे" असेंहि ते म्हणतात. कमिशनर अनस्लिंगर यांनी न्यू ऑर्लिन्स, फिलाडेल्फिया या संस्थानांत व्यसनी लोकांना, गुन्हेगाराला दहादहा वर्षांच्या शिक्षा ठेवून त्याची कडक बजावणी केल्याबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण कसें घटलें हें सप्रमाण दाखवून सर्वत्र कडक बजावणीची मागणी केली आहे.
 बालगुन्हेगारीचा विचार करतांना डॉ. रूथ अलेक्झँडर यांनी असेच विचार प्रगट केले आहेत. 'नॅशनल शेरीफस् असोसिएशन' पुढे त्यांचें भाषण झाले. बालगुन्हेगारांना मायाळूपणें वागवावें, त्यांना गुन्हेगार न मानतां रोगी मानावें, त्यांच्या मनोव्यापारांचे मानसशास्त्रीय अवगाहन करावें, या विचारसरणीमुळे समाजांत कसे अनर्थ घडत आहेत हें त्यांनी दाखवून दिलें आहे. शास्त्रज्ञांची कल्पना अशी की, त्या बालगुन्हेगारांतला