पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

पाश्चात्य देशांत, ब्रिटन-अमेरिकेत लोकशाही संबंधी आणखी जी नवीं नवी उदात्त व अति उदात्त तत्त्वें निर्माण होत आहेत त्यांचाहि भराभर आपण स्वीकार करीत आहोत. पण त्याग, राष्ट्रनिष्ठा, समाजहितबुद्धि, विवेकनिष्ठा, धर्मनिष्ठा यांच्या अभावी ही तत्त्वें समाजाला अत्यंत घातक होतात हे अमेरिकन तत्त्ववेत्त्यांच्या ध्यानी येऊ लागले आहे. अमेरिका हा देश धनवैभवाने किती समृद्ध आहे हें सर्वश्रुतच आहे. आपल्या अखिल भारतीय अर्थसंकल्प इतका मोठा अर्थसंकल्प तेथील एका जनरल मोटर्स या कंपनीचा आहे आणि अमेरिकन नागरिक तितकाच पैसा म्हणजे १६०० कोटी रुपये दरसाल नुसत्या सिगरेटवर खर्च करतात, पण असे असूनहि आज अमेरिकेच्या लोकशाहीचा पाया पोखरत चाललेला आहे. कारण वरील अगदी सामान्य सद्गुण तेथील जनतेतून नाहीसे होत चालले आहेत. अमेरिकेत गुन्हेगारी, दरवडेखोरी, संघटित लूटमार यांचे प्रमाण किती वाढले आहे तें मागे एका प्रकरणांत सांगितलेच आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी अमेरिकन तत्त्ववेत्ते, कार्यकर्ते, समाजधुरीण काय करीत आहेत ते येथे थोडें सविस्तर सांगण्याचा विचार आहे. त्या सर्वांचं सूत्र एकच आहे की, समाजजीवनावर जास्त कडक नियंत्रण ठेवणे हाच लोकशाहीच्या रक्षणाचा मार्ग आहे, तोच तरणोपाय आहे. अलीकडच्या काळांत मानसशास्त्राच्या खोल अभ्यासामुळे अमेरिकनांची दृष्टि जास्त व्यापक व उदार झाली आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याच्या जपणुकीविषयी ते पराकाष्ठेचे हळवे झाले आहेत. त्याचप्रमाणे उदार दृष्टीमुळे गुन्हेगारांना तुरुंगांत प्रेमळ वागणूक द्यावी, त्यांना शिक्षाहि सौम्य कराव्या याविषयी तेथे अट्टाहास चालू आहे. विद्यार्थी हे तर सर्वत्र समाजाचे लाडकेच असतात. तेव्हा शाळांतून छडी, शिक्षा, इ. रानटी प्रकार काढून टाकून बेशिस्त विद्यार्थ्यांच्या मनाचें अवगाहन करावें असें तत्त्व तेथे जारी झाले आहे. पण गेली पन्नास वर्षे हे प्रयोग झाल्यानंतरहि अमेरिकेंत गुन्हेगारी, दरवडेखोरी, खून, अत्याचार, बलात्कार, जाळपोळ, विध्वंस, दुष्ट प्रवृति, यांना आळा तर बसलेला नाहीच; उलट त्यांची भयंकर प्रमाणांत वाढ झाली आहे, म्हणून आज आता तेथे प्रतिक्रिया सुरू झाली आहे; आणि तेथील विचारवेत्ते आता कडक कायदे, कठोर शासन, नियंत्रण, दण्डन यांची मागणी करीत आहेत. त्यावांचून अमेरिकेत लोकसत्ता टिकून