पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २५३

राहणार नाही, व्यक्तिस्वातंत्र्य, समता यांचे रक्षण होणार नाही अशी त्यांची खात्री झाली आहे. भारतांत गेल्या दहा-बारा वर्षांत राष्ट्रीय उत्पादन शे. ३२ ने वाढलें आहे, पण याच्या लक्षपट समृद्धि अमेरिकेत गेली पन्नास वर्षे नांदत आहे, तरी नैतिक मूल्ये, धर्म निष्ठा यांचा ऱ्हास होत गेल्यामुळे एवढी समृद्धि असूनहि, ती नित्य वाढत असूनहि, तेथील नेत्यांना अमेरिकन लोकशाहीच्या रक्षणाची चिंता निर्माण झाली आहे. त्यांच्या मानाने आपण अत्यंत दरिद्री आहों आणि आपली नैतिक पातळी मात्र त्यांच्यापेक्षा जास्त खाली आहे. अशा स्थितीत तेथील पंडितांचे विचार आपल्याला उद्बोधक होतील असें वाटतें.
 अमेरिकेत अफू, चरस, गांजा इ. मादक द्रव्यांच्या व्यसनांचा प्रसार पराकोटीला गेला आहे. त्याच्या शोधासाठी अमेरिकन सीनेटने एक समिति नेमली होती. तिचा अहवाल वाचून कोणीहि माणूस सर्द होईल, थिजून जाईल. या व्यसनांचा प्रसार बह्वंशीं तीस वर्षांच्या खालच्या तरुण लोकांत असतो. एकवीसच्या आंतली मुलेंहि कांही कमी नाहीत. एकदा व्यसन लागलें की, त्याचा खर्च हळूहळू वाढत जातो. पुढे हा खर्च रोज शंभर रुपयांपर्यंत जातो. अर्थात् अफीण मनुष्य चोऱ्या करूं लागतो, दरवडे घालतो, स्त्रिया शरीर-विक्रय करूं लागतात. अमेरिकेतील गुन्हेगारीपैकी एकचतुर्थांश गुन्हेगारी या व्यसनांतून निर्माण झाली आहे. एकट्या न्यूयार्क शहरांत अफीण लोक रोज आठ लाखांच्या चोऱ्या करतात. १९५५ सालीं मादक द्रव्याच्या भोक्त्यांनी एका हेरोन या द्रव्यापायीं १५० कोट रु. खर्च केले. या द्रव्याचा व्यापार आंतरराष्ट्रीय प्रमाणावर चालतो. इटली, फ्रान्स येथून हे द्रव्य आणणाऱ्या मोठ्या संघटना अमेरिकेत आहेत. त्यांतल्या एकेका एजंटाला महिना दोन ते तीन लाख रुपयांची प्राप्ति होते. त्यामुळे व्यसनांचा प्रसार करण्यासाठी ते पराकाष्ठा करतात, आणि स्वतःच्या व्यापाराच्या रक्षणासाठी राजकारणी लोकांना वश करतात. या संघटनांची शिस्त कमालीची कडक असते. सरकारला यांतला कोणी फितूर झाल्यास त्याचा तत्काळ खून होतो. त्यांतील एक अत्यंत विलक्षण आणि उद्बोधक (आणि अप्रत्यक्षपणे तितकीच उद्वेगजनक) गोष्ट अशी की, या मादकद्रव्यसंघटनेतील मनुष्याला स्वतःला व्यसन असतां कामा नये असा त्यांतील श्रेष्ठींचा दण्डक