पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिले : १५

पक्षांपैकी अंतीं विजय कोणाचाहि झाला तरी यादवी माजून देशाचें बळ खच्ची होणार यांत शंकाच नाही. आणि हीच दुफळी वाढत गेली की, शेवटीं अराजक माजून देश परकीय आक्रमकांच्या भक्ष्यस्थानी पडतो. पण तसें कांहीहि रशियांत घडलें नाही. वास्तविक क्रान्तीनंतर भांडवली देशांनी रशियावर जें आक्रमण केलें त्यापासून राष्ट्राचें रक्षण करण्यासाठी ज्या सेना कम्युनिस्टांना उभाराव्या लागल्या त्या सर्व ट्रॉट्स्कीने उभारल्या होत्या. त्यांचे सर्व नियंत्रण त्याच्या हातीं होतें, पण स्टॅलिनच्या सुलतानशाहीला विरोध करतांना ट्रॉट्स्कीला सेनेस वश करतां आलें नाही; आणि पुढेहि हें कोणाला साधले नाही. स्टॅलिनशीं ज्यांचे हाडवैर निर्माण झालें होतें असे कित्येक कर्तबगार व समर्थ पुरुष होते. पोलीस व लष्कर यांतले मोठमोठे अधिकारीहि त्यांत होते; पण त्यांपैकी कोणालाहि निराळा पक्ष निर्माण करतां आला नाही. लष्करांतले अधिकारीहि लष्करांत भेद करू शकले नाहीत. क्रुश्चेव्हसारखा पाताळयंत्री मनुष्यहि हें करूं शकला नाही. यांतलें रहस्य आपण समजावून घेतलें पाहिजे.
 नवचीनमध्येहि समाज असाच संघटित आहे. तेथेहि समाज दुभंगावा, यादवी माजावी अशा घटना नित्य घडत आहेत. १९४९ सालीं तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या हाती सत्ता आली. त्यानंतर पुढील दोन वर्षांत या ना त्या निमित्ताने तेथील नेत्यांनी जवळ जवळ वीस लाख लोकांची कतल केली आहे. अत्यंत समर्थ अशा, अगदी श्रेष्ठ अशा, मालिकेतील नेत्यांनाहि माओ, चौ एन् लाय यांच्याविरुद्ध गेल्याबरोबर देहान्त प्रायश्चित देण्यास चीनचे हे नेते कचरत नाहीत. मध्यंतरी मतस्वातंत्र्याचा सर्वांना हक्क द्यावा अशी एक लहर माओट्सी टुंग याला आली. त्याबरोबर नवचीनच्या राज्यकारभारावर अनेक प्रकारांनी कडक टीका होऊं लागली. कोणी तर रशियावर व कोणी मार्क्सवादावरहि टीका केली. त्याबरोबर माओचा सुलतानी दण्ड पुन्हा फिरू लागला व त्याने अनेकांचे बळी घेतले. शिक्षणखात्याचे उपमंत्री त्सेन चीलून, नॅशनल डिफेन्स कौन्सिलचे उपाध्यक्ष जनरल लुंग, वाहतूक मंत्री चंग चो चून, अन्नखात्यांतील अधिकारी चंगने, लाकूडखात्यातील अधिकारी लो चिंग ची, अशा मोठमोठ्या पदांवरच्या अधिकाऱ्यांना एका क्षणांत माओ धुळीला मिळवतो, त्यांचा पाणउतारा करतो. त्यांना