पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

तर ! त्यांचें जें आध्यात्मिक तेज त्याचा झोत त्यांनी काळाबाजारवाले, करचुकवे, न्यायांत विक्षेप करणारे राजकारणी, दंगली करणारे विद्यार्थी यांच्याकडे वळविला तर ! आणि १९५१ साली त्यांनी संकल्प केला त्याप्रमाणे ५ कोटी एकर जमीन भूदानांत मिळाली असती तर ! जयप्रकाश नारायण व विनोबा भावे हे शांतिसेना घेऊन नेफा प्रदेशांत चीनशी लढा करण्यास गेले असते तर ! तात्पर्य असे की, भारताचा अन्नधान्याचा, आर्थिक पुनर्रचनेचा, औद्योगिक उत्पादनाचा थोडक्यांत म्हणजे लोकशाहीला अवश्य ती समृद्धि निर्माण करण्याचा प्रश्न भूदान किंवा सर्वोदय यांनी शतांशाने, सहस्रांशानेही सोडविलेला नाही, किंवा इतक्या अंशाने तो या आंदोलनांतून सोडविला जाईल असा विसारहि त्यांनी दिलेला नाही. भूदान चळवळीचें मूल्यमापन करणें हा येथे हेतु नाही. भारतांतील मानवाच्या हृदयांतील ईश्वरी अंशाला आवाहन करून लोकशाही यशस्वी होण्यास अवश्य तें कर्तृत्व, ती कार्यक्षमता, तो त्याग, तो राष्ट्रहितबुद्धि येथे भूदान आंदोलकांना निर्माण करता येईल काय हें पाहण्यासाठी हा प्रपंच केलेला आहे. पण काँग्रेस किंवा इतर पक्ष यांच्याहून कांही निराळीं सामाजिक मूल्ये निर्माण करण्यांत त्यांना यश आले आहे किंवा भारताचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने कांही निराळा मार्ग यांना सांपडला आहे, असे भूदानाच्या दहा वर्षांच्या आंदोलनावरून दिसत नाही.

उत्पादित धनाची विषम वाटणी

 काँग्रेसने सत्ता हातीं घेतल्यापासून गेल्या बारा-तेरा वर्षांत उत्पादनवाढीचे जे प्रयत्न केले त्याचा थोडासा आढावा घेऊन लोकशाही यशस्वी होण्याच्या दृष्टीने त्याचे फलित काय आहे याचाहि विचार येथे होणे अवश्य आहे. गेल्या बारा वर्षांत आपले राष्ट्रीय उत्पन्न शे. ३२ या प्रमाणांत वाढले आहे. भारतांत अनेक ठिकाणी कारखाने निघाले आहेत. त्यांतून इंजिनें निघत आहेत, खतांचें उत्पादन होत आहे, पोलाद तयार होत आहे, निरनिराळ्या ठिकाणी तेलाची कुंडे सापडली आहेत, दगडी कोळशासारखाच लिग्नाइट हा पदार्थ विपुल सापडला आहे. टेलिफोन, सायकली, विजेचे दिवे यांची निर्मित निर्यात करण्याइतकी होऊं लागली आहे, अणुभट्ट्या