पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २४७

निष्पाप असे असतात हा भ्रम कायमचा मनांत बाळगणें हें गांधीवाद व सर्वोदय यांचें एक प्रधान लक्षण आहे. कोरापुटने तो भ्रमाचा भोपळा फोडून टाकला. येथील आदिवासी लोकांत सर्व प्रकारची व्यसनें आहेत, जमिनीवरून होणारी भांडणें आहेत, उच्चनीचता आहे, हेवेदावे आहेत. सत्तेचा, पुढारीपणाचा आणि धनदौलतीचा लोभ आहे. तेथे कार्यकर्ते जमिनीचे वाटप करण्यास गेले तेव्हा त्यांना अतिशय विषम वाटप करावें लागलें, कारण त्या आदिवासींमधले नायक, त्यांच्यांतले श्रेष्ठी यांनी तसा बनाव जमवूनच आणला. त्यांनी गटबाजी केली आणि लोकांकडूनच विषम वाटपाला मान्यता मिळविली. वाटपाच्या वेळीं समाईक म्हणून दहा टक्के जमीन ठेवावी अशी योजना होती, पण प्रत्यक्षांत दोन टक्के जमीनच ठेवतां आली, आणि तिच्या कसणुकीकडे कोणीच लक्ष देत नाही. कारण ती समाईक ! म्हणजे वैयक्तिक भावना, स्वामित्वभाव हा तेथे इतरांप्रमाणेच आहे. एक दोन वर्षांनी तर केलेलें भूदान आणि ग्रामदान रद्द करून घेण्याची आदिवासी लोकांत अहमहमिका लागली. यावरून हें स्पष्ट आहे की, कोरापुटमध्ये कसलेंहि हृदय परिवर्तन झालेले नाही, मानवांतील परमेश्वरी अंश जागा झाला नाही, आणि अहिंसक जनशक्ति निर्माण झाली नाही. सर्वोदय संमेलन भरलें म्हणजे तेथे ज्या गांवांची विशेष प्रगति झाली असेल तेथल्या रम्य वार्ता तपशिलाने सांगण्यांत येतात. खानदेशांतील अकाणी महाल व अक्कलकुवा तालुका येथील ग्रामराज्यें, चांदा जिह्यांतील वरोडा येथील आनंदवन मंगलधाम, बिहारमधील बेराई, घटप्रभेजवळचें बिजूर आणि कोल्हापुरातील गवसें येथील ग्रामपरिवार या गांवच्या हकीकती खरोखरच अत्यंत स्फूर्तिदायक व उद्बोधक आहेत. त्यांची वर्णने वाचतांना मनाला आल्हाद होतो. श्री. जयप्रकाश नारायण हीं वर्णने करून मग म्हणतात की, 'लोक निराश कां होतात हे मला समजत नाही.' अशीं ग्रामराज्य पांच लाख खेड्यांत झाली तर ! असा आशावाद ते व्यक्त करतात. खरोखर अशीं ग्रामराज्यें पांच लाख खेड्यांत झाली तर भारतांतलेच काय, पण सर्व जगांतले सर्वच प्रश्न सुटतील. पण असा आशावाद बऱ्याच बाबतीत बोलून दाखविण्याजोगा आहे. विनोबांनी पंधरा वीस दरोडेखोरांचें हृदय-परिवर्तन केलें तसें भारतांतल्या सर्व दरोडेखोरांचे केलें