पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

असे की, भूदान कार्यकर्त्यांचा तसा दृष्टिकोणच नाही. अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्यासारखे कांही कार्यकर्ते अट्टाहासाने तेंच आमचें उद्दिष्ट आहे असें सांगतात. पण या एकंदर आंदोलनाची बैठक आध्यात्मिक आहे. भूदान- कार्यकर्त्यांना अहिंसक ग्रामराज्य स्थापन करावयाचें आहे. प्रत्येक ग्रामराज्य स्वयंपूर्ण करावयाचें आहे, आणि शेवटीं शासनमुक्त समाज निर्मावयाचा आहे. त्यामुळे जमीन मिळतांच तिचें प्रथम वाटप करणें आणि जास्तीत जास्त उत्पादनवाढ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सर्व प्रयत्न करणें हे त्यांच्या हिशेबांत बसत नाही. मानवाच्या गरजा कमी करणें आणि त्याचा आध्यात्मिक विकास करणें यांकडे आंदोलनाचें लक्ष जास्त आहे. दुर्देव असें की, उत्पादनवाढीत एकपट अपयश आले असले तर मानवांतील ईश्वर जागृत करण्यांत आंदोलनाला दसपट अपयश आलें आहे. कोरापुट जिल्ह्यांतील भूदानाचे कार्य म्हणजे या आध्यात्मिक विकासाची दुःखद कहाणी आहे. तेथे आदिवासींच्या हृदयांतला परमेश्वर जागा होणें दूरच राहिलें, पण कार्यकत्यांच्या चित्तांतच मुळांत परमेश्वरी अंश आहे की नाही याची शंका निर्माण व्हावी अशी स्थिति झाली. या कार्यकर्त्यापुढे निश्चित उद्दिष्ट नव्हतें. त्यामुळे सारखी उद्दिष्टें बदलत व त्यामुळे गोंधळ होई. यांतूनच अनेक भिन्न मतप्रवाह निर्माण होऊन ग्रामराज्ये संघटित करण्यास गेलेल्या या कार्यकर्त्यांतच संघटितपणा राहू शकला नाही. 'ग्रामदान'च्या फेब्रुवारी १९५८ च्या अंकांत श्री. अण्णासाहेब सहस्रबुद्धे म्हणतात, "बाहेरील जनतेचें सहकार्य मिळविण्याचा आम्हीं कांहीच प्रयत्न केला नाही, ही फार मोठी चूक झाली. सरकारी नोकर व काँग्रेस कार्यकर्ते हे निकृष्ट आहेत आणि आपण मात्र एका मोठ्या आंदोलनाचे प्रवर्तक आहोंत असा अहंभाव आमच्या ठायीं होता. जनतेशी घनिष्ठ संबंध मीं निर्माण केले नाहीत हा सर्वांत मोठा प्रमाद झाला. विपुल आर्थिक मदत मिळाल्यामुळे आपली मनें भ्रष्ट झाली. कार्यकर्त्यांत एकात्मता नाही, संघटनेविषयी आस्था नाही, निश्चित ध्येयाची कल्पना नाही. विकासकार्याविषयी बहुतेकांना पूर्ण अज्ञान होतें, पण हा दोष घालविण्याचा प्रयत्नहि कोणी केला नाही." हें झालें कार्यकत्यांचें चारित्र्य. आदिवासींचें तर कांही विचारावयासच नको. अगदी जंगलांत निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे लोक सत्त्वशील, निरागस, पुण्यवान्,