पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २४५

शासनमुक्त समाज हेंच त्यांचे ध्येय आहे, आणि भारतांत आध्यात्मिक भावना पाश्चात्त्य देशांपेक्षा जास्त प्रभावी असल्यामुळे येथे मानवांतील ईश्वरी अंशाला आवाहन करून भारताचा उत्कर्ष करून घेता येईल अशी या लोकांची श्रद्धा आहे. भूदान आंदोलनाचे अध्वर्यु आचार्य विनोबा भावे यांनी हा प्रयोग गेली दहा वर्षे चालविला आहे. या आंदोलनाने भारतांत सर्व प्रकारची क्रान्ति होईल व भारत हा जगाला आदर्श असा देश होईल अशी विनोबांची व एकंदर भूदान- कार्यकत्यांची श्रद्धा आहे. भारताच्या लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने गेल्या नऊ दहा वर्षांत या आंदोलनाच्या पुरस्कर्त्यांनी जें कार्य केलें त्याचें परीक्षण करणें अवश्य आहे. आज आपल्यापुढे हीच मूलभूत समस्या आहे. हृदयपरिवर्तनाच्या मार्गाने मानवांतील ईश्वरी अंशाला केलेल्या आवाहनाने भारतांतील जनतेमध्ये त्याग, संयम, राष्ट्रहितबुद्धि, विवेकशीलता, अविरत कष्टांची हौस हे गुण जर निर्माण होणार असतील तर येथे लोकशाही यशस्वी होईल की नाही ही शंका घेण्याचें मुळीच कारण नाही. वर भारताच्या जीवनांतील सर्व क्षेत्रांची जी आपण पाहणी केली तिच्यावरून हे गुण त्या मार्गाने येथे निर्माण होतील अशी आशा दिसत नाही. म्हणून या भूदानमार्गात त्या आशेला कांही जागा आहे का हें पाहणें अगत्याचें आहे.
 या दृष्टीने पाहतां येथेहि संपूर्ण निराशाच आहे. १९५१ साली ही चळवळ सुरू झाली आणि १९५९ साली विनोबांनी पंजाबची यात्रा पुरी केली. त्या यात्रेच्या शेवटी पंजाबात कार्यकर्ते मुळीच मिळत नाहीत म्हणून विनोबांनी अश्रु ढाळले. यात्रेची असली अखेरी ही कांही शुभसूचक नाही. १९५७ पर्यंत ५ कोटी एकर जमीन मिळवावयाची आणि तिची योग्य वाटणी करून भारतांतील आर्थिक विषमता नष्ट करावयाची हा विनोबाजींचा संकल्प होता. पण आतापर्यंत एकंदर ४२ लक्ष एकरच जमीन मिळाली आहे. हें कार्यहि कांही थोडें नाही. पण या जमिनीचें योग्य वितरण होऊन, विनोबांना इष्ट तीं ग्रामराज्य स्थापन होऊन, या ४२ लक्षांतून इतर जमिनींच्या मानाने कांही विशेष उत्पन्न झालें असतें, या पद्धतीने वितरण केलें असतां भारताचा अन्नधान्याचा प्रश्न कांही अंशी जरी सुटला असता तरी या आंदोलनांतून कांही आशा निर्माण झाली असती. पण दुर्दैव