पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान


राष्ट्रसंघटना
 रशिया किंवा चीन या देशांत अखिल राष्ट्र संघटित करण्यांत नेत्यांना एवढें अभूतपूर्व यश यावें हा सकृद्दर्शनी मोठा चमत्कार वाटतो. आता क्रान्ति होऊन चाळीस वर्षे झाली. पण सोव्हिएट रशियाच्या संघटनेला तडा सुद्धा गेलेला नाही. या अवधीत संघटना भंगावी, दुफळी होऊन दौर्बल्य निर्माण व्हावें, मध्यवर्ती शासन दुबळें होऊन अराजक माजावें, असे अनेक प्रकार घडले आहेत. स्टॅलिनने आपल्या सर्व सहकाऱ्यांना, लेनिनच्या वेळी कर्तबगार ठरलेल्या प्रभावी नेत्यांना, वाटेल ते आरोप ठेवून गोळ्या घातल्या आहेत. मध्यंतरी जे शुद्धीकरण झाले त्यांत सैन्यांतल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांनाहि त्याने परलोकाची वाट दाखविली आहे. सामुदायिक शेतीच्या प्रयोगांत त्याने लक्षावधि शेतकऱ्यांच्या रक्ताचे पाट वाहविले आहेत; आणि दशलक्षावधि कामगार- शेतकऱ्यांना सैबेरियांतील यमपुरीत धाडून दिले आहे. सुशिक्षित विद्याजीवी वर्गाशी तर त्याचा उभा दावा. योजनांच्या प्रारंभीच्या काळांत हजारो मध्यमवर्गीय सुशिक्षितांची त्याने हत्या केली. त्यांची कुटुंबेंच्या कुटुंबे उद्ध्वस्त करून टाकली. त्याने डॉक्टर म्हटला नाही, वकील म्हटला नाही, लेखक नाही, कवि नाही. त्याची मर्जी फिरली की ह्यांची घटका भरलीच. असे असूनहि या चाळीस वर्षांत सोव्हिएट राज्यांत कोठे म्हणण्यासारख्या बंडाळ्या झाल्या नाहीत. यादवीचा तर भासहि निर्माण झाला नाही. हा खरोखर फार मोठा चमत्कार आहे. सैन्याच्या बळावर, यमदण्डाच्या जोरावर त्याने संघटना टिकविली या म्हणण्यांत फारसा अर्थ नाही. कारण यादवी माजते ती बहुधा संन्यांतल्या अधिकाऱ्यांतच माजते. इतर विरोधकांना त्याने देहदण्ड वा त्याची दहशत घालून नष्ट केलें हें समजू शकतें. पण ज्या लष्कराच्या बळावर या विरोधकांचें निर्दाळण करावयाचे त्या लष्करांत दोन पक्ष झाल्यावर यादवी अटळ होऊन बसते. अफगाणिस्तान, इराण, इराक, सिरिया यांचे इतिहास आपल्या डोळयांपुढे ताजेच आहेत. तेथे दर ठिकाणी बंड झालें तें सैन्यांत झाले, आणि त्यांतूनच यादवी निर्माण झाली. सैन्यांतले कर्ते अधिकारीच विरुद्ध गेले, त्यांच्यांत दुफळी झाली की, स्टॅलिनचें तरी काय चालणार? दोन