पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४० : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

भागवत आझाद म्हणाले की, "भ्रष्टाचार कसा चालला आहे है काँग्रेस- श्रेष्ठींना पूर्ण माहीत आहे. तरी चौकशीला त्यांचा विरोध आहे."
 जगांतलें एक दारुण दुःख असें आहे की, येथे दुष्ट शक्ति या नेहमी चटकन् संघटित होतात; पण सात्त्विक शक्ति, कल्याण शक्ति मात्र तशा होत नाहीत. शुभशक्ति जेथे संघटित होतात तेथेच लोकशाही समर्थ होऊ शकते. अन्यत्र नाही. गेली दहा वर्षे काँग्रेसमधल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर जी कडक टीका केली आहे ती पाहून हा विचार मनांत येतो की, भारताची हीच शोकान्तिका आहे. काँग्रेसमधल्या शुभशक्ति दुबळ्या आहेत, असंघटित आहेत. त्या नुसत्या दीन, आर्त क्रंदन करीत आहेत. त्या संघटित होऊन अन्यायाचा प्रतिकार करूं शकत नाहीत. पुण्याच्या बैठकींत के. के. शहा यांनी हेंच कटु सत्य सांगितलें. ते म्हणाले, "काँग्रेसचे सामान्य पाईक हे सत्य सांगण्यास भितात. काँग्रेसच्या प्रतिनिधींनाहि टीका करण्याची भीति वाटते. श्रेष्ठी शिक्षा करतील ही भीति सदैव त्यांच्या मनांत असते." याचा अर्थ फारच वाईट आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तोंडावर टीका करणारे काँग्रेसजन आज काँग्रेसश्रेष्ठींवर टीका करण्यास भितात ! लोकशाहीच्या दृष्टीने विचार केला तर जे भितात ते आणि ज्यांची भीति वाटते ते दोघेहि लोकशाही पेलण्यास सारखेच असमर्थ आहेत. दोघांचीहि लक्षणें सरंजामशाहीचीं आहेत. काँग्रेसने नेमलेल्या 'दहांच्या समिती'ने हेंच म्हटलें आहे. फ्यूडल रिलेशनशिप, असाच शब्द तिने वापरला आहे.
 काँग्रेसचे सामान्य पाईक आणि कार्यकर्ते श्रेष्ठींच्यापुढे नांगी टाकतात त्याचप्रमाणे निवडणूकनिष्ठेमुळे काँग्रेसश्रेष्ठी हे व्यापारी, काळाबाजारवाले यांच्यापुढे नांगी टाकतात. त्यागी कमिटीने हे स्पष्ट केलें आहे. 'दि डायरेक्ट टॅक्सेस ॲडमिनिस्ट्रेशन इन्क्वायरी कमिटी' असें हिचें नांव आहे. तिचें म्हणणे असे की, करखातें कायद्याची कडक अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे करचुकव्या लोकांची संख्या वाढत आहे. इंग्लंडमध्ये दरसाल एक दोन करचुकव्यांना व त्यांना साह्य करणाऱ्या हिशेबनिसांना तुरुंगांत पाठविलें जातें. पण करखात्याने १९४७ पासून (म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीपासून) एकाहि माणसावर खटला भरला नाही. हें सांगून कमिटी सरकारला उपदेश करते की, 'कायद्याची कडक अंमलबजावणी करावी,' पण सरकारने प्रामाणिकपणे