पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २३९

काय?" श्री. संजीव रेड्डी यांचा गैरसमज झालेला दिसतो. काँग्रेसने सेवा केली तिचें हें प्रशस्तिपत्र नव्हे. अखिल भारतभर प्रत्येक प्रदेशांत व लोकसभेत भारतीय जनतेने काँग्रेसच्या हाती विश्वासाने सत्ता दिली हें सेवेचें प्रशस्तिपत्र आहे आणि प्रत्येक कांग्रेसजन हा लुच्चा, अप्रामाणिक असलाच पाहिजे, असा जो लोकांत समज पसरला आहे तो म्हणजे जर प्रशस्तिपत्र असेल तर तें सत्ता प्राप्त झाल्यानंतरच्या कार्याबद्दलचें आहे. वर दाखविल्याप्रमाणे काँग्रेसजनांतील अनेक कार्यकर्त्यांनीहि तसलेच प्रशस्तिपत्र दिले आहे. न्याय आणि कायदा यांची प्रतिष्ठा राखणें हें काँग्रेसला आता झेपेनासे झाले आहे, हें त्याचेंच लक्षण होय. म्हैसूर प्रदेश राज्याचे माजी मुख्य मंत्री निजलिंगप्पा धारवाड जिल्हा कांग्रेस कार्यकर्त्यांपुढे बोलतांना म्हणाले की, "काँग्रेसमध्ये उच्च ध्येयाची सध्या थट्टा चालू आहे. सर्वोदयाच्या नांवाखाली कित्येक काँग्रेसजनांनी पैसा केला आहे, त्याची माहिती मला आहे. यावर प्रश्न असा येतो की, या गुन्हेगारांना शिक्षा करण्याची कोणती तजवीज निजलिंगप्पांनी केली? लोभी, स्वार्थी, सत्तास्पर्धी लोकांचा प्रत्येक प्रदेशांत कांग्रेसमध्ये गट तयार होतो. अनेक गट होतात. तसा त्यागी, ध्येयवादी, निःस्पृह, न्यायाची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी प्राणार्पणाला सिद्ध असलेला काँग्रेसजनांचा गट कां होत नाही? इंग्रज सरकारशी लढा देणारे ते काँग्रेसजन स्वातंत्र्यानंतर कोठे गेले? शिर्डीच्या काँग्रेसच्या सभेत श्री. ठाकोरभाई यांनी निजलिंगप्पांप्रमाणेच तक्रार केली आहे. "काँग्रेसजन सरकारवर दडपण आणतात आणि आपली कामे करून घेतात. गुंड, दारूबाज यांच्या वतीनेहि ते दडपण आणतात" असें ते म्हणाले. पुण्याच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीचा वृत्तान्त वर दिलाच आहे. न्याय, कायदा, सत्य, नीति यांची काँग्रेसला कदर नाही, असा आरोप काँग्रेसजनांनीच तेथे केला. भागवत आझाद यांनी फारच प्रखर टीका या वेळीं केली. एका काँग्रेसवाल्याला भ्रष्टाचारासाठी पक्षांतून हाकललें होतें, पण कोणाच्या तरी वशिल्याने त्याला परत घेण्यांत आलें आणि मंत्रिपदहि देण्यांत आलें, हें उदाहरण त्यांनी दिले. श्री. चिंतामणराव देशमुखांनी भ्रष्ट काँग्रेसश्रेष्ठी, मंत्री व अधिकारी यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र न्यायासन निर्मावे अशी सूचना केली तेव्हा पंडित नेहरूंनी त्यांना 'अशी प्रकरणें माझ्याकडे द्या' असे सांगितलें, पण