पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

निवडणूकनिष्ठ, सत्तालोभी झाल्यावर हिंदुस्थान लोकशाहीला लायक आहे काय अशी शंका मनांत कां येऊं नये? काँग्रेसमध्ये हीं सर्व पापें आचरली जात आहेत हे प्रमुख कांग्रेसजनांनीच १९६० च्या जूनमध्ये झालेल्या पुण्याच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकींत दाखवून दिले आहे. या बैठकीत शामनंदन मिश्र, माणेकलाल वर्मा, हनुमंतय्या यांनी पंडित नेहरू, गोविंदवल्लभ पंत, संजीव रेड्डी, ढेबरभाई इत्यापि काँग्रेसश्रेष्ठींना अत्यंत कडवट शब्दांत आपली टीका ऐकविली. या टीकेचे शब्द अत्यंत जहरी आणि विषारी असे होते, आणि ते या श्रेष्ठींच्या शिष्यवरांनीच वापरले होते. काँग्रेसची सत्ता ही श्रेष्ठींची मिरास झाली आहे. आपलें आसन ढळू नये म्हणून ते तरुणांना पुढे येऊ देत नाहीत. महात्माजींची ही संस्था भ्रष्ट झाली आहे. धर्म व सत्य यांचा तिच्यांतून लोप झाला आहे. तरी कार्यकारिणी या प्रकारांकडे लक्ष देत नाही; कांग्रेसच्या तत्त्वांवर विश्वास नसलेल्या लखपतींना कांग्रेस तिकिटे देते. ही कांग्रेस समाजवादी कशी ठरते? कांग्रेस संघटनेला बलिष्ठ करील असा कोणताहि कार्यक्रम श्रेष्ठींच्या (हायकमांडच्या) जवळ नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते खेडयांत जातात ते फक्त मतयाचनेसाठी आणि तेथे जाऊन ते एकमेकांविरुद्ध वाटेल ते आरोप करतात. ही काँग्रेसची शिस्त ! शामनंदन मिश्र तर म्हणाले की, "काँग्रेस वर्किंग कमिटीचीच काँग्रेस तत्त्वांवर श्रद्धा नाही." गोविंदवल्लभ पंतांची, 'ते इतक्या म्हातारपणी खूप काम करतात म्हणून,' नेहरूंनी प्रशंसा केली. तेव्हा हनुमंतय्या म्हणाले, "त्यांना इतकें काम करायला कोणी सांगितलें आहे ? तरुणांना संधि द्यायची नाही म्हणून ते जागा अडवून बसले आहेत. वास्तविक त्यांचे काम करण्यास समर्थ असे अनेक तरुण लोक आहेत; पण आपण व आपला परिवार यांच्या हाती सत्तासूत्रे कायम ठेवावी हाच श्रेष्ठींचा हेतु असल्यामुळे नेत्यांची दुसरी पिढी ते निर्माण होऊंच देत नाहीत." असा भडिमार पुण्याच्या सभेंत सारखा चालला होता.
 बंगलोरला भाषण करतांना (२७-७-६०) काँग्रेसचे अध्यक्ष संजीव रेड्डी यांनी जनतेविरुद्ध एक तक्रार केली. ते म्हणाले, "सध्या लोक असेंच धरून चालतात की, प्रत्येक काँग्रेसजन हा लुच्चा असलाच पाहिजे!" हें सांगून ते रागाने म्हणाले की, "आम्ही इतके दिवस जी देशसेवा केली त्याचें हें प्रशस्तिपत्र की