पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २३७

नंतरसुद्धा तो होत नाही. यावरून जनशक्तीची आराधना करण्याचे महत्त्व जास्त कोणाला वाटते, लोकसत्तेला की दण्डसत्तेला, हें सहज ध्यानांत येईल.
 लोकशक्ति आपल्यामागे उभी करण्यासाठी जें लोकशिक्षण करावयाचें त्याची कांग्रेसजनांना व नेत्यांना किती आस्था आहे तें यावरून स्पष्ट होईल. मागे अनेक ठिकाणी याचे काँग्रेस- नेत्यांच्या मुखीचेच पुरावे दिले आहेत. या सर्वावरून जनतेवरील श्रद्धा हें लोकशाहीचें आद्यतत्त्वच भारतांतून कसें नष्ट झाले आहे तें दिसून येईल. अशा स्थितीत दण्डसत्तेचे आव्हान स्वीकाण्याइतकी येथे लोकशाही यशस्वी होईल अशी आशा धरण्यांत काय अर्थ आहे ?

काँग्रेसची निवडणूक- निष्ठा

 लोकशाही हा अत्यंत श्रेष्ठ धर्म होय. तो आचरणांत आणणें हें फार कठीण कर्म आहे. या राज्यपद्धतींत जे लोक निवडून येतात त्यांच्या हातीं सत्ता आली की, सर्व सुखे त्यांना वश होतात, आणि मग ती सत्ता हातून जाऊ नये म्हणून वाटेल तीं पापें ते आचरूं लागतात. निवडून येणें व सत्ता काबीज करणे एवढेच त्यांचे ध्येय बनतें. असें ज्या देशांत होतें तेथे लोकसत्ता कधीहि यशस्वी होणें शक्य नाही. ब्रिटनमध्ये लोकसत्ता यशस्वी झाली त्याचें कारण असे की, तेथील शास्ते हे फार निःस्पृह, कर्तव्यदक्ष आणि लोभमोहातीत असे बह्वंश असतात आणि तसे ते नसले, ते लोभवश झाले तर त्यांना तत्काळ पदच्युत करण्याचे सामर्थ्य तेथील जनतेंत आहे. भारतांत या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. असें एक पाप नाही की, जें कांग्रेसचे व इतर पक्षांचे लोक सत्तालोभाने आचरीत नाहीत. खोटे सभासद नोंदविणे, काँग्रेसच्या किंवा पक्षाच्या तत्त्वावर ज्यांची निष्ठा नाही त्यांना केवळ ते लखपती आहेत म्हणून तिकिटे देणें, निवडणुकांत यश यावें म्हणून जातीयवादाला आवाहन करणें, व्यापारी, काळा बाजारवाले, करचुकवे यांना संभाळून घेणें, आपल्या परिजनांचीं पापें झाकण्यासाठी न्याय, कायदा यांची वाटेल ती विटंबना करणें, अशीं अनंत प्रकारचीं पापें आजचे सत्ताधारी प्रत्यहीं आचरीत आहेत. अशा स्थितींत येथे लोकशाही यशस्वी कशी होणार ? आणि ज्यांनी सर्व हयात महात्माजींच्या सहवासांत घालविली असे नेतेच