पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

सत्ता हेंच प्राप्तव्य आहे. सेवा हें नाही. काँग्रेस ही सेवासंस्था राहिलेलीच नाही. जनतेला शिकवून जवळ केलें नाही, तिचें सहकार्य मिळविलें नाही तर सर्व व्यर्थ आहे; पण काँग्रेस संघटनेतील श्रेष्ठींना या कार्याच्या महतीची जाणीवसुद्धा नाही. या संघटनेतील कार्यकारिणीच्या सभासदांमध्ये अंतिम उद्दिष्टाविषयी तळमळ अशी नाहीच. सर्व अनर्थाच्या बुडाशीं हे कारण आहे. काँग्रेसजनांतील ध्येयनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा कमजोर होत चालली आहे. त्यामुळे जातीयतेची व इतर विषे पसरत आहेत व त्यामुळे ऐक्याचा भंग होऊन दुही, दुफळी सर्वत्र माजली आहे. काँग्रेसमध्ये शिस्त नाही, नीतीची कांही इष्ट पातळीहि नाही. ती एक म्हातारी संस्था झाली असून तेथे तरुण नेतृत्व निर्माण करण्याचे कसलेहि प्रयत्न केले जात नाहीत." (टेन मेंबर कमिटी ऑफ दि काँग्रेस पार्लमेंटरी पार्टी- अहवाल- सारार्थाने- टाइम्स : २७-११-५९) विदर्भामध्ये कुळकायदा १९५८ अखेर लागू झाला. त्यानंतर त्याचे फलित शेतकऱ्याला काय मिळाले याविषयी प्रा. ठाकुरदास बंग यांनी माहिती दिली आहे. मालगुजारी नष्ट होणार म्हणून जमीनदार जागे झाले. त्यांनी वाटेल तो प्रचार केला. कुळांची दिशाभूल केली. कायद्याचे वाटेल ते अर्थ सांगितले आणि लाखो कुळांकडून जमिनीच्या हक्कासंबंधीचे राजीनामे लिहून घेतले. रोज शेकड्याने राजीनामे येऊ लागले, तेव्हा येथे कांही घोटाळा असावा असें सरकारच्या ध्यानीं आलें. मग त्याने काय उपाययोजना केली? जनता जागृति? छे छे! तें काँग्रेसचे कार्य नाहीच. सरकारने तहसीलदार, कलेक्टर यांना कडक पत्रे लिहिली की, कायद्याची अंमलबजावणी योग्य केली पाहिजे, पण ती होतच होती. मालगुजार कुळाकडून सर्व कायदेशीरच करून घेत होते आणि त्याची अंमलबजावणी कमिशनर, कलेक्टर उत्तम करीत होते. गरज होती ती याच्या पलीकडे जाऊन जनतेला कायद्याचे स्वरूप समजावून देण्याची, तिला सावध करण्याची व तिची फसवणूक होऊं नये म्हणून सतत तिच्या जवळ राहण्याची. पण जवळ जवळ २०-२५ लाख एकरांचा ताबा कुळांनी आपण होऊन अज्ञानाने सोडून दिला त्याअर्थी तिला कायद्याचे स्वरूप समजावून देण्याची कसलीहि व्यवस्था कायदा करणाऱ्यांनी केली नव्हती हें स्पष्ट आहे. चीनमध्ये, रशियामध्ये कायदा करण्याच्या आधी वर्षभर त्याचा प्रचार केला जातो. भारतांत