पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

नरमेध केला. त्या वेळीं इटली, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, दक्षिण अमेरिकेंतील अनेक देश येथे सोव्हिएट रशियाच्या द्वेषाची एक प्रचंड लाट उसळली होती. लक्ष लक्ष नागरिकांनी रशियाविरोधी घोषणा करीत मिरवणुकी काढल्या, सभा भरविल्या. या सर्व देशांच्या कोट्यवधि नागरिकांनी वर्तमानपत्रांतून, रेडिओवरून रशियावर निर्भर्त्सनेचा, निषेधाचा भडिमार केला; पण रशियाने या सर्व विरोधाला कवडीइतकीहि किंमत दिली नाही. तो ताठरपणेंच उभा राहिला, आणि हे बलाढ्य देश त्याला लवमात्र वाकवूं शकले नाहीत. आजहि रशिया सर्व देशांतल्या प्रतिनिधींच्या सभा अशाच उधळून देतो. त्यांची हेटाळणी करतो. या सर्व देशांना रशियन जनतेंत दुही आहे, रशियन नेत्यांच्या मागे ती उभी नाही अशी नुसती शंका आली असती, तरी त्यांनी जनतेच्या दोन फळ्यांत पाचर ठोकून रशियांत यादवीचा वणवा निश्चित पेटविला असता. त्यांच्या परराष्ट्रीय धोरणाचें तें तर मुख्य सूत्र आहे; पण त्यांना तसें कांही एक करतां आलेले नाही. यावरून रशियन जनता तेथील नेत्यांच्या मागे उभी आहे ही वस्तुस्थिति मान्य करण्यावांचून गत्यंतर नाही. हा सर्व तेथील लोकशिक्षणाचा प्रभाव आहे. रशियांत व चीनमध्ये कोणताहि कायदा करण्यापूर्वी जनतेला त्याची उपयुक्तता, आवश्यकता, हितकारकता व महत्त्व पटवून देण्यासाठी विश्वप्रयत्न केले जातात हे प्रसिद्धच आहे. त्याच्या शतांशहि प्रयत्न भारतांत होत नाहीत. श्री. रा. कृ. पाटील, प्रा. धनंजयराव गाडगीळ यांनी अनेक वेळां अनेक लेखांत, भाषणांत हें कटु सत्य स्पष्ट करून सांगितलें आहे. वास्तविक दण्डसत्तेला लोकांच्या मान्यतेचें, संमतीचें एकपट महत्त्व वाटलें तर लोकसत्तेला तें त्याच्या दसपट वाटावें; पण लोकसंमत शासन हे लोकशाहीचें आद्यमूल्य मुखाने शंभर वेळां उच्चारूनहि काँग्रेसचे नेते त्याच्या शिक्षणाची काडीमात्र पर्वा करीत नाहीत. आपल्या समाजविकास योजना, राष्ट्रविकास योजना या जनतेच्या योजना होतच नाहीत. सामान्यजनांना त्या आपल्या आहेत, आपल्यासाठी आहेत असें वाटतच नाही. जनतेची शक्ति त्यांच्यामागे मुळीच उभी नाही हें त्या योजनांचें मूल्यमापन करणाऱ्या बहुतेक सर्व समित्या कंठरवाने सांगत आहेत. समाजविकास योजनेच्या सहाव्या अहवालांत निरीक्षकांनी असें स्वच्छ म्हटलें आहे की, या योजनांची सर्व सूत्रे वरून हलत असतात. जनतेला