पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २३३

त्या आक्रमणापासून आपली मातृभूमि मुक्त करता येईल की नाही, अशी जी दारुण शंका, कृष्ण मेनन सोडून, प्रत्येक भारतीयाच्या मनाला व्यथित करीत आहे तिचें हें कारण आहे, आणि आज एका आक्रमणाबद्दल जी शंका आली तिच्यामुळे आता एकंदर भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने, लोकसत्ताक राज्यपद्धतीचा अवलंब करण्यांत आपण फार मोठी चूक केली की काय, अशी दुसरी व्यापक शंका मनाला त्रस्त करीत आहे. लोकशाही म्हणजे वैभव, समृद्धि, सामर्थ्य हें ब्रिटन-अमेरिकेतले समीकरण येथे खरें न ठरतां लोकशाही म्हणजे दुफळी, दुही, अराजक, यादवी, दौर्बल्य हे इतर देशांतलें दुसरें समीकरण येथे खरें ठरणार अशी अशुभ लक्षणे भारतांत दिसूं लागली आहेत. येथले संप, येथले गोळीबार, प्रत्येक पक्षांतल्या दुफळ्या, जबडा वाशीत चाललेला बेकारीचा ज्वालामुखी, पंजाबी सुभा, नागादेश, द्रवीड कझगम, विदर्भचंडिका या घातक चळवळी आणि चीनचें प्रत्यक्ष आक्रमण हीं दुसऱ्या समीकरणाकडे आपली वेगाने वाटचाल सुरू झाल्याचें आनंदून सांगत आहेत. या सगळ्या लक्षणामागे रोग दिसतो तो हा की, येथे लोकशाहीवर कोणाचीच श्रद्धा नाही. निराशा वाटते ती यामुळे.

लोकशिक्षण

 लोकशिक्षण हा लोकशाहीचा पाया आहे, समाजसुधारणेचें तें मूलतत्त्व आहे हे चीन- रशियांतील दण्डधर शास्ते जितकें जाणतात त्याच्या शतांशाने जरी भारताच्या शास्त्यांनी जाणलें असतें तरी येथे लोकशाही पेलणारे 'लोक' निर्माण झाले असते. कांही झाले तरी- म्हणजे लोकसत्ता असली तरी किंवा दण्डसत्ता असली तरी- लोकांची अनुकूलता, जनतेची संमति हेंच शासनाचें खरें सामर्थ्य आहे, तोच सरकारच्या सामर्थ्याचा आत्मा आहे हे चीन-रशियाचे शास्ते निश्चित जाणतात. त्यांच्या सत्ता या अनियंत्रित असल्या तरी त्यांच्या मागे बहुसंख्य जनता कटिबद्ध होऊन निष्ठेने उभी आहे यांत तिळमात्र संदेह नाही. त्यांवांचून जगांतल्या अत्यंत बलाढ्य अशा अमेरिकेसारख्या लोकसत्तेला सहज हेटाळून टाकावें, तिचा वाटेल तो अवमान करावा, आणि तिने तो निमूटपणें सोसावा एवढे अचाट सामर्थ्य रशियाला किंवा चीनला कधीच प्राप्त झालें नसतें. हंगेरीमध्ये रशियाने अक्षरशः