पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

अशी श्रद्धा आहे काय ? त्या श्रद्धेने प्रेरित होऊन त्यांनी सत्ताप्राप्तीनंतर लोकशिक्षणाचे प्रयत्न केले काय, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्या उतरावर आपल्या लोकशाहीचें भवितव्य अवलंबून आहे.
 स्वातंत्र्यप्राप्ति झाली त्या वेळी लोकशाहीची तत्वें भारतांत प्रसृत झाली होती हें खरें पण तीं शेकडा दहापंधरा लोकांतच ! अस्पृश्य, आदिवासी व इतर तत्सम जमाती या तर त्या तत्त्वांच्या कक्षेबाहेरच होत्या आणि इतर सामान्य जनतेला शेवटच्या स्वातंत्र्यलढ्यांत त्यांची नुसती तोंडओळख होऊं लागली होती. अशा स्थितीत स्वातंत्र्याचे महासाधन हाती येतांच पूर्वीपेक्षाहि जास्त निष्ठेने या देशांत लोकशाही मूल्यांची जोपासना करण्याचे अखंड, अविरत, अविश्रांत प्रयत्न होणें अवश्य होतें. सत्ताधारी कांग्रेस- पक्षाने हे लोकशिक्षणाचें कार्य प्रथम हाती घ्यावयास पाहिजे होतें. कारण, त्याच्यावर त्याच्या सत्तेचें व भारताच्या लोकशाहीचें मंदिर उभे राहावयाचें होते; पण या दृष्टीने पाहता काँग्रेसचे नेते अत्यंत अक्षम, अगदी अपात्र व पूर्णपणे दृष्टिशून्य असे ठरले. लोकशाही यशस्वी करावयाची तर आधी आपल्यामागे लोकशक्ति उभी केली पाहिजे, त्यासाठी विवेकनिष्ठा, त्याग, बुद्धिप्रामाण्य, सामाजिक प्रबुद्धता, व्यापक दृष्टिकोण, समाजहितबुद्धि, अन्यायाचा संघटित प्रतिकार करण्याची वृत्ति, सहिष्णुता या गुणांचे शिक्षण समाजाला देणें अवश्य असतें. हे गुण अंगी बाणले तरच लोकशाहीला अवश्य ते लोक देशांत निर्माण होतात. पूर्वी राजांच्या राज्यांत त्यांच्या प्रजा असत. आता त्या प्रजांचे 'लोक' झाले पाहिजेत. हें परिवर्तन फार मोठे आहे. जागरूक, प्रबुद्ध, विवेकशील, राष्ट्रनिष्ठ जनता म्हणजे 'लोक'. ते निर्माण केले तरच लोकशक्ति निर्माण होते. यासाठी लोकशिक्षणाची फार आवश्यकता असते; पण गेल्या चौदा वर्षांत काँग्रेसच्या नेत्यांनी त्या दृष्टीने कसलेहि प्रयत्न केले नाहीत. याचा अर्थच असा की, काँग्रेसची लोकशक्तीवर, जनशक्तीवर श्रद्धा नाही. आपल्या नेत्यांनी दण्डसत्तेच्या मूल्यांचा मुखाने जाहीरपणे धिक्कार केला, आणि लोकसत्तेच्या तत्त्वांच्या घोषणा केल्या; पण त्या लोकसत्तेच्या तत्त्वांचा कृतीने त्यांनी तितकाच धिक्कार केला आहे, तितकीच अवहेलना केली आहे. आज दण्डसत्तेचें आव्हान आपल्याला स्वीकारतां येईल की नाही, तिच्या आक्रमणाला आपल्याला तोंड देतां येईल की नाही,