पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २३१


जनतेवरील श्रद्धा ?
 भारतामध्ये गेली शंभर वर्षे स्वातंत्र्य, समता, बंधुता, बुद्धिप्रामाण्य या तत्त्वांची जोपासना रानडे, टिळक, आगरकर, महात्माजी, पंडितजी या महापुरुषांनी केली. त्यामुळेच लोकशाही शासनाच्या आकांक्षा येथील जनतेंत निर्माण झाल्या, आणि स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्या बळावत गेल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दोनदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या पुष्कळच उच्च पातळीवरून झाल्या. त्यामुळे येथेहि लोकांच्या मनांत लोकशाहीचीं कांही तत्वें रुजली असावीं असें वाटू लागले. गेली बारा वर्षे देशामध्ये स्थिर शासन निर्माण करण्यांत काँग्रेसला बरेंच यश आलें, त्यामुळे आपली लोकशाही यशस्वी होईल अशी थोडी आशाहि वाटू लागली; पण स्वातंत्र्यप्राप्तीबरोबरच काँग्रेसला सत्तेची प्राप्ति झाली, आणि तेव्हापासूनच तिच्या चारित्र्याची सत्त्वपरीक्षा सुरू झाली. दुर्दैवाने या सत्त्वपरीक्षेत ती टिकली नाही, आणि म्हणूनच भारताच्या लोकशाहीच्या भवितव्याची विचारी लोकांना चिता वाढू लागली आहे. ही चिंता कां वाटते याचे आता तपशिलाने विवेचन करावयाचें आहे.
 ब्रिटनमध्ये लोकसत्ता यशस्वी झाली त्याचे पहिले कारण म्हणजे तेथील. नेत्यांची जनतेवरील श्रद्धा हे होय. कोणत्याहि पक्षाचें शासन असले तरी त्याच्यामागे लोकशक्ति उभी असली पाहिजे हें तेथील नेत्यांनी जाणलें आहे. लोकांना योग्य प्रकारें शिक्षण दिलें तर त्यांच्या ठायीं सामाजिक प्रबुद्धता निर्माण होऊन त्यांची संघटित शक्ति शासनाच्या मागे निश्चित उभी राहू शकते, व शासन हें अनियंत्रित होऊन अन्याय करूं लागलें, जुलूम करूं लागलें, किंवा अकार्यक्षम व नालायक ठरले तर त्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचें सामर्थ्य तिच्या ठायीं निर्माण होतें असा ब्रिटिशांचा दृढ विश्वास आहे. म्हणून लोकशिक्षण हे लोकवादी नेत्यांचे आद्य कर्तव्य होय असें तेथे समजतात. लोकशाहीत लोक हेच खरे देशाचे धनी असें मानतात. १८६८ सालीं मतदानाचा हक्क विस्तृत करण्यांत आला तेव्हा 'या आपल्या धन्यांना प्रथम शिक्षण दिले पाहिजे' हें तेथील नेत्यांच्या ध्यानी आले आणि त्यांनी कसोशीने तसे प्रयत्न केले. जनतेवर, लोकशक्तीवर आपल्या नेत्यांची