पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिले : १३

उज्ज्वल आहे. १९१२ साली जर्मनींतील क्रप कारखान्याचा शतवर्षाचा उत्सव झाला. त्या वेळी काढलेल्या स्मारक ग्रंथांत 'रशियन तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालीच क्रपच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलें' असें म्हणून रशियाचें ऋण मान्य केलेले आहे. क्रान्तीनंतर रशियनांनी या बाबतींत अखंड परिश्रम करून संशोधन चालू ठेवलें होतें. १९४६ सालीं 'ॲकॅडमी ऑफ आर्टिलरी सायन्सेस' स्थापन झाली. तेथील संशोधक प्रोफेसर ब्लागोनरॉव्हॅव्ह व टिखोन् रॉव्हॅव्ह यांना या प्रगतीचें बव्हंशी श्रेय आहे. हेरगिरीने मिळविलेलें, किंवा परकी शास्त्रज्ञांनी आणलेलें ज्ञान एखाद्या राष्ट्राला विज्ञानशास्त्रांत अग्रेसरत्व प्राप्त करून देईल हें खरें नाही. इतर अनेक शास्त्रज्ञांनीहि हेंच मत दिलें आहे. सोव्हिएट रशियाची वैज्ञानिक प्रगति ही रशियन शास्त्रज्ञांनीच घडविलेली आहे. उसन्या आणलेल्या परक्या शास्त्रज्ञांना तिचे श्रेय देतां येत नाही हें त्यांना मान्य आहे, आणि तसे आहे म्हणूनच त्यांना रशियाच्या आक्रमक लष्करी सामर्थ्याविषयी अहोरात्र चिंता वाटत आहे.
 अर्वाचीन लष्करी सामर्थ्याच्या अभिवृद्धीला लागणारें जें षडंग बल तें सोव्हिएट रशिया, चीन इत्यादि दण्डसत्तांनी कसें प्राप्त करून घेतलें याचा विचार आपण करीत आहों. अत्यंत बलाढ्य अशा पाश्चात्त्य लोकसत्तांना त्यांच्या आक्रमणाची भीति वाटावी असें युद्धसामर्थ्य या दण्डसत्तांनी जोपासलेलें आहे. तें त्यांनी कसें जोपासलें हें पाहणे भारताच्या दृष्टीनेह महत्त्वाचे आहे. कारण आपल्यालाहि त्या आक्रमणाची सदैव भीति आहे. षड्विध बलसाधनापैकी शस्त्रास्त्रे, औद्योगीकरण, शिक्षण व शास्त्रज्ञान यांचा विचार आपण केला. आता त्यांनी समाजसंघटना कशी केली याचा विचार करावयाचा आहे. वर सांगितलेल्या चतुरंग बलामागे संघटित असें राष्ट्र नसेल तर त्याचा कांही उपयोग नाही. उलट भस्मासुरासारखें तें बल स्वसमाजाच्या नाशाला कारण होतें हें अनेक देशांच्या उदाहरणांवरून दिसून येते. राष्ट्रांत यादवी माजली, समाज दुभंगला, त्याच्या अनेक चिरफळ्या झाल्या की, वरील जड शस्त्रास्त्रं त्याचा किती संहार करतील तें सांगावयास पाहिजे असें नाही. पण या दण्डसत्तांनी अगदी दुर्भेद्य अशा संघटना निर्माण करून ही आपत्ति टाळण्यांत मोठे यश मिळविले आहे.