पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३० : लोकसत्तेला दण्डसत्तेचं आव्हान

पाहिजे असे मला वाटतं. पाश्चात्त्यांची व्यक्तिस्वातंत्र्य, समता हीं लोकशाहीची तत्त्वें आम्हांला परवडणार नाहीत असें चीनचे नेते म्हणतात. भारताला ती परवडतील काय ? लोकशाहीसाठी विवेकशीलता, संयम, समाजहितबुद्धि, कार्यक्षमता, चारित्र्य, या गुणांची आवश्यकता आहे. ब्रिटनमध्ये आज ते गुण प्रकर्षाने दिसतात म्हणून तेथे लोकशाही टिकली आहे. पण तेथेहि ही परिणत अवस्था तीनचारशे वर्षांच्या दीर्घ प्रयत्नाने प्राप्त झाली आहे. हे गुण जसजसे वाढत गेले तसतशी तेथली लोकशाही विकसित होत गेली. 'व्यक्तिस्वातंत्र्य, नाहीतर मृत्यु' अशी आज तेथील नागरिकांची धारणा झाली आहे. कायद्याचें पालन केलेच पाहिजे ही वृत्ति आज सातशे वर्षे ब्रिटिशांच्या अंगी बाणलेली आहे. न्यायासनाची प्रतिष्ठा राखलीच पाहिजे हें ब्रिटिश सरकारचें आद्य तत्त्व आहे. व्यक्तिस्वातंत्र्याला कोठे धक्का लागला, न्यायासनाचा थोडा जरी अवमान झाला तरी ब्रिटिश जनता त्या अन्यायाचा प्राणपणाने प्रतिकार करील, त्यासाठी लागणारी अभेद्य संघटना उभारील आणि विवेकाने तिची पथ्येंहि पाळील. या गुणांमुळेच इंग्लंडची लोकसत्ता प्रबळ झालेली आहे. हा केवळ दैवयोग नाही. पण हे गुण नसतांना एकदम संपूर्ण लोकायत्त शासनाचा अवलंब करणें हें भारताला परवडणार आहे काय, याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांतहि आणखी एक ऐतिहासिक घटना आपण विचारांत घेतली पाहिजे. ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रान्ति झाली, आणि त्यानंतर तो देश हळूहळू समृद्ध, संपन्न होत गेला. त्याचे साम्राज्य निर्माण झालें आणि मगच तेथे संपूर्ण लोकशाही अवतरली. त्याआधी रशियासारखी दण्डसत्ता तेथे नसली तरी तितकीच क्रूर व कठोर अशी आर्थिक दण्डसत्ता होती. तेथेहि कामगार पंधरा सोळा तास काम करीत असत. दण्डभयाच्या ऐवजी तेथे उपासमारीचें भय होते. कामगारांनी लढा करून ही स्थिति हळूहळू पालटून टाकली; पण तेंहि त्यांना साम्राज्यामुळे जी समृद्धि आली, इतरांना पिळून जें धन ब्रिटनला मिळाले त्याच्या जोरावर करतां आलें. भारतामध्ये ती विवेकशीलता नाही आणि तें धनहि नाही. अशा स्थितींत संपूर्ण लोकशाहीच्या तत्त्वांचा आपण जो अवलंब केला आहे त्याला कितपत अर्थ आहे, तें कितपत श्रेयस्कर आहे, याचा विचार भारतीयांनी केला पाहिजे.