पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण आठवें : २२९

त्यांवर त्याला जय मिळवितां येत नाही. या तत्त्वांचे त्याच्या मनावर कितीहि संस्कार केले तरी बलवान् इंद्रियग्राम त्याची समाजहितबुद्धि, त्याची कर्तव्यनिष्ठा ही झांकळून टाकतो आणि अत्यंत वेगाने त्याला वैयक्तिक हिताच्या, संकुचित स्वार्थाच्या मार्गानेच ओढून नेतो. अशा मानवाला समाजसेवा, राष्ट्रसेवा करण्यास उद्युक्त करावयाचें तर वरील दोन निष्ठांच्या साह्याला दण्डाची भीतिही अवश्य आहे. माणूस हा धर्मवश असण्यापेक्षा, विवेकवश असण्यापेक्षा जास्तकरून भीतिवश आहे, दण्डवश आहे, हें कटुसत्य ध्यानांत घेऊन प्रथमपासूनच चीन-रशियाचे नेते शहाणे झाले, सावध झाले आणि त्यांनी दण्डसत्तेचा आश्रय केला. प्रत्येक मानवाच्या ठायीं परमेश्वराचा अंश असतो आणि त्याला आवाहन केलें की, त्याच्या सर्व सुप्त सद्गुणांचा विकास होतो ही विचारसरणी फार उदात्त आहे, पण तिचा रशियन नेत्यांनी क्षणभरहि अवलंब केला नाही. तिच्यावर त्यांचा कदाचित् विश्वासहि नसेल, पण त्यांनी हे जाणले की, हा परमेश्वरी अंश जागा होण्यास बहुतेक वेळां फटक्यांची, दण्डाची, भीतीची आवश्यकता असते. हा रोख व्यवहारवाद आहे, वास्तववाद आहे आणि त्याचाच आश्रय करून दण्डसत्तेच्या पुरस्कर्त्यांनी आपला मार्ग आखला आहे. चीनमध्ये सध्या कामगारांना, शेतकऱ्यांना रोजी पंधरा, सोळा तास काम करावें लागतें, ख्रिस्टल वेल्झेन बचर नांवाचा एक युरोपीय प्रवासी चीनमध्ये गेला असतां त्याने चिनी अधिकाऱ्यांना याविषयी प्रश्न केला. त्याला उत्तर देतांना पेकिंगचे शिक्षणमंत्री म्हणाले, "सक्ती केली नाही, दण्डभय दाखविलें नाही, तर लोक इतके काम करणें शक्य आहे काय ? आम्हांला राष्ट्राची पुनर्रचना करावयाची आहे. त्यामुळे आमच्या देशाला पाश्चात्त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य परवडणार नाही. वाद, मतभेद, चर्चा यांना आम्ही अवसर दिला तर कामाचा वेग मंदावेल. तें कसें चालेल ?" कठोर दण्डभयानेच माणसें कष्टाला तयार होतात, या भीतीनेच त्यांच्यांतला परमेश्वरी अंश जागृत होतो हे कटु सत्य चीन-रशियांनी नुसतें तोंडी सांगितलें नाही, तर प्रत्यक्ष त्याचा आचार करून, त्यायोगे आपलीं राष्ट्र बल-वैभव-संपन्न करून त्यांनी तें सिद्ध केले आहे.
 या दृष्टीने भारताने अंगीकारलेल्या तत्त्वांचा फेरविचार आपण केला