पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

निर्वाळा देत आहेत. ईजिप्त, तुर्कस्तान, पाकिस्तान, इंडोनेशिया इ. देशांत गेल्या दहा वर्षांत लोकसत्ताक शासने स्थापन झाली; पण हिंदुस्थानांतील धरणांच्या व नव्या इमारतींच्या भितीप्रमाणे बांधकामें पुरी होण्याच्या आतच तीं कोसळली. अराजकाने, यादवीने, बेबंदशाहीने तेथे लोकशाहीचा बळी घेतला, आणि मग बहुतेक ठिकाणी दण्डसत्ता प्रस्थापित झाली.

फेरविचार आवश्यक

 जगांतल्या लोकशाहीचें इतिवृत्त थोडक्यांत वर दिलें आहे. तें बारकाईने अभ्यासून आपण भारताचा विचार केला पाहिजे. आपण लोकशाहीच्याच मार्गाने जाणार, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता या थोर तत्त्वांच्या आश्रयानेच आपण भारताचा उत्कर्ष करून घेणार अशी आपण प्रतिज्ञा केली आहे. हा आपला आग्रह कितपत सयुक्तिक आहे, या मार्गाने जाऊन बल, वैभव, सामर्थ्य, समृद्धि यांचा लाभ आपल्याला करून घेता येईल काय, जगांतल्या बहुतेक देशांना तो मार्ग सोडून दण्डसत्ता किंवा निदान बह्वंशीं मर्यादित अशी लोकसत्ता यांचा अवलंब करावा लागला हें दिसत असतांना भारतांत मात्र तसा प्रसंग येणार नाही असा जो आत्मविश्वास आपण प्रकट करीत आहोंत तो कितपत समर्थनीय आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. मागल्या दोन प्रकरणांत धर्मनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा या दोन महाप्रेरणांवा आपण विचार केला. लोकशाही यशस्वी होण्यासाठी त्या दोन निष्ठा अत्यंत अवश्य आहेत हें आपण पाहिले. पण त्यांचें तें उदात्त व परमदिव्य रूप पाहून मनांत प्रश्न असा येतो की, नजीकच्या भविष्यकाळांत भारतीयांच्या मनांत त्या रुजविणें कितपत शक्य आहे ? रशिया आणि चीन यांनी आपल्या समाजांत राष्ट्रनिष्ठा दृढमूल करण्याचे विश्वप्रयत्न केलेले आहेत, आणि कम्युनिझमच्या तत्त्वज्ञानाला जवळ जवळ धर्माचें रूप देऊन त्या धर्माचा संदेश प्रत्येक नागरिकाला पढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे; पण एवढ्याने भागेल असें तेथील नेत्यांना वाटलें नाही. या उदात्त प्रेरणांचा राष्ट्रसंघटनेसाठी ते उपयोग करतातच, पण त्यांनी हें जाणलें की, बहुसंख्य मानवांच्या मनांत लोभ, स्वार्थ, अहंभाव, धनवासना, कामवासना, याच प्रबळ असतात, आणि केवळ धर्मनिष्ठा किंवा राष्ट्रभक्ति यांच्या आवाहनाने