पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

उणीव भरून काढली नाही तर रानटी समाजापुढे त्यांचा टिकाव लागत नाही, हें तेथे स्पष्ट केलें आहे. भारताचा आतापर्यंतचा तोच इतिहास आहे. भागवत धर्माचीं श्रेष्ठ तत्त्वें प्रत्यक्ष व्यवहारांत आणण्याचा उपदेश संतांनी केला. त्यामुळे समाजाला दौर्बल्य मात्र आलें. त्याच वेळी संघटनेचीं श्रेष्ठ तत्त्वें व जास्त मारक हत्यारें मात्र मापण शोधून काढलीं नाहींत, म्हणून शेकडो वर्षे आपण पारतंत्र्याच्या नरकांत पडलों होतों. गेल्या शंभर वर्षात लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, स्वातंत्र्यवीर सावरकर, वल्लभभाई, सुभाषचंद्र यांनी कडव्या राष्ट्रनिष्ठेचें बीज पेरून आपले राजकारण वास्तवाच्या दृढ पायावर उभे केलें होतें. महात्माजींनी त्या राजकारणांत पुन्हा सत्य, अहिंसा व शत्रुप्रेम इत्यादि थोर तत्त्वें प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना त्यांत यश आले नाही. आपला स्वातंत्र्यलढा ब्रिटिशांच्या द्वेषाच्या प्रेरणेने लढला गेला, पण चीनने जपानशीं वीस वर्षे जो घनघोर सशस्त्र संग्राम केला तसा आपण केला असता तर आज अखिल भारत अर्वाचीन युद्धकलेत निष्णात होऊन आज आपल्याला शांततामय वाटाघाटींचा आश्रय करावा लागला नसता. पण एवढ्यानेच भागले नाही. उच्च मूल्यांच्या, श्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी श्रेष्ठ संघटनेची, विवेकबुद्धीची, त्यागवृत्तीची अत्यंत आवश्यकता असते. दुर्दैवाने त्याहि बाबतीत आपले दिवाळे वाजले आहे. स्वातंत्र्य लढयाच्या काळी जी राष्ट्रनिष्ठा भारताच्या ठायीं होती तीहि आज राहिलेली नाही. प्रांताप्रांतामध्ये, जातीजातीमध्ये, जमातीजमातीमध्ये अत्यंत कटु असें विषारी वैमनस्य चेतलें आहे. काँग्रेस पक्षांत प्रत्येक प्रांतांत दुफळी तिफळी झाली आहे. केंद्रातहि काँग्रेस भंगली आहे. ज्यांनी हीं विषे उतरावयाची, तेच तीं विष पौष्टिकें म्हणून समाजांत पसरून देत आहेत. सत्तालोभ, धनलोभ, हीन स्वार्थ यांनी प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक संघटनेचा धागान् धागा कुजून गेला आहे. कर्तृत्व आणि चारित्र्य यांची कोणती पातळी आपण गाठली आहे हें सर्वश्रुत आहेच. मारक हत्यारांचा विचार आपल्याला वर्ज्यच आहे. त्या बाबतींत रानटी दण्डसत्ताच संस्कृत समाजापेक्षा श्रेष्ठ ठरल्या आहेत. असें सर्व बाजूंनी अंतर्बाह्य दौर्बल्य असतांना आपण सत्य, अहिंसा, शत्रुप्रेम, निःपक्ष धोरण, जागतिक न्याय हीं श्रेष्ठ मूल्यें, हा श्रेष्ठ धर्म कशाच्या आधाराने