पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सातवे : २२२

परत गेल्या. मुलूख बळकावून बसल्या नाहीत. उलट चीन, रशिया यांच्या फौजा मात्र जेथे गेल्या तेथे भूमि बळकावून बसल्या. शिवाय, आपण हे ध्यानांत ठेवले पाहिजे की, थोडा युद्धसंभव दिसतांच भारतांत आपल्या सेना घुसवाव्या की नाही याचा विचार करीत, नीति अनीति पाहात बलाढ्य राष्ट्र स्वस्थ बसणार नाहीत. भारताची परवानगीहि विचारणार नाहीत. त्यांना अवश्य वाटेल तेव्हा तीं राष्ट्रें आपापली सैन्य भारताच्या भूमीवर निश्चितपणें उतरवितील. कांगोमध्ये सेना पाठवितांना भारताने कोणाला विचारले होते ? तद्देशीयांची परवानगी काढली होती काय ? इतर राष्ट्र युद्धाचा वास येतांच अशाच सेना धाडतील. त्यांना शत्रु म्हणून येऊ द्यावयाचें की मित्र म्हणून त्यांचे स्वागत करावयाचे एवढेच भारताच्या हाती राहील. हे ध्यानी घेऊनच आपण वेळींच मित्रराष्ट्र जोडून ठेवणें अवश्य आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्काळ आपण या उद्योगाला लागावयास हवें होतें, आणि आता तर जगण्यामरण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. एका दण्डसत्तेने आपली भूमिच आक्रमिली आहे व दुसरीने ५० मेगॅटनी बाँबचे स्फोट करून जगाच्या माथ्यावर भस्मासुराप्रमाणे हात ठेवण्याची तयारी चालविली आहे. कम्युनिस्ट दण्डसत्तांचे हे आव्हान भारताला स्वीकारावयाचें असेल, आक्रमणांतून आपली भूमि मुक्त करावयाची असेल, तर तटस्थतेचें उदात्त, आध्यात्मिक राजकारण सोडून देऊन, वास्तववादाचा, व्यवहारी वृत्तीचा अवलंब करून, इतर सामान्य देशांप्रमाणेच आपण मित्रराष्ट्रसंघ केला पाहिजे व राष्ट्रीय स्वार्थ साधला पाहिजे. कडवी राष्ट्रनिष्ठा आणि समाजोन्मुख धर्मनिष्ठा या महाशक्तींचा अवलंब करून अंतर्गत सामर्थ्य वाढविणें आणि लष्करी करारांनी मित्रराष्ट्र जोडून बाह्य सामर्थ्य प्राप्त करून घेणें यावर अहोरात्र आपण सर्व मन केन्द्रीभूत केलें तरच आपल्या लोकसत्तेचें आपल्याला कम्युनिस्ट आक्रमणापासून रक्षण करतां येईल.
 दुसऱ्या प्रकरणांत रानटी समाज व सुसंस्कृत समाज यांच्या बलाबलाचा विचार केला आहे. त्याचा वाचकांनी येथे पुन्हा विचार करावा. कोणताहि समाज संस्कृतीची एक पायरी वर चढला की, त्याचें बल, त्याचें लढाऊ सामर्थ्य तितकें कमी होते. संघटनेचीं श्रेष्ठ तत्त्वें, श्रेष्ठ निष्ठा, थोर विवेकबुद्धि व जास्त मारक हत्यार यांचा आश्रय करून संस्कृत समाजाने ती