पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

वास्तविक हळूहळू कालांतराने, पायरी पायरीने आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ, असें ब्रिटिश राज्यकर्ते म्हणतच होते; पण तेव्हा आपल्याला घाई झाली होती. आता प्रगति अशी की, ती घाई नष्ट झालेली आहे. 'आपल्या वाटाघाटी दहा वर्षे चालतील किंवा दहा शतकें- हजार वर्षे- चालतील. त्यांत कांहीच हानि नाही. घिसाडघाईने कांही करण्याने मात्र नाश ओढवेल' असें पंडितजी शुक्लानगरच्या भाषणांत म्हणाले. (भारतज्योति : ३०-१०-६०) स्वातंत्र्यलढ्याच्या काळांत भारतांतील नेमस्त पक्षांतील श्रीनिवासशास्त्री, सप्रू, चिंतामणि यांचे असेंच धिम्में धोरण होते. घिसाडघाई करण्यांत अर्थ नाही असेंच ते म्हणत होते. त्यांच्यावर पंडितजींनी आत्मचरित्रांत अत्यंत कडक टीका केली आहे. 'त्यांना अपमानाची चीड नाही, संताप नाही. ब्रिटिश आमच्या बांधवांना पायपुसण्याप्रमाणे वागवितात याचें त्यांना सोयरसुतक नाही' असे त्यांनी म्हटले आहे. आज पाकिस्तान-चीनविषयी पंडितजींची हीच नेमस्त वृति आहे. त्यांना या दोन देशांविषयी चीड नाही, संताप नाही. स्वबांधवांच्या अवमानाचे सोयरसुतक नाही. उलट प्राचीन काळच्या स्नेहसंबंधांची आठवण होऊन त्यांच्या मनांत प्रेमच उचंबळतें. भारताची राजकारणांतली अध्यात्मनिष्ठा ती हीच होय. शत्रु-मित्र भाव नाही, राग-द्वेष नाहीत, फलाची आकांक्षा नाही, सर्वत्र समबुद्धि आहे.
 पण यामुळेच भारताला धोका आहे. राजकारणांत अत्यंत तीव्र शत्रुमित्रभाव असणेंच अवश्य असतें ; आणि आक्रमकांचे निर्दाळण करून स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ साधणे यांतच त्याची परिणति झाली पाहिजे. मित्रराष्ट्रसंघ निर्मावयाचे, मित्र राष्ट्रांशी तुल्यारिमित्रत्वाचे लष्करी करार करावयाचे हें राजकारणांत अगदी अटळ आहे. लष्करी करारांची आपले नेते नेहमी हेटाळणी करतात. आपण अमेरिकेशी लष्करी करार केला आणि त्या अन्वयें अमेरिकेच्या लष्करी फौजा भारतांत आल्या तर तें भारताला अवमानकारक आहे असे काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे. मित्र राष्ट्राच्या साह्यार्थ फौजा आल्या तर तो अवमान आणि शत्रुराष्ट्राच्या फौजा आक्रमक म्हणून आल्या तर त्यांत मात्र अवमान नाही अशी ही विचारसरणी आहे ! वास्तविक अमेरिकेने पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत ब्रिटन, फ्रान्समध्ये व इतर अनेक देशांत साह्यार्थ फौजा धाडल्या होत्या, आणि युद्ध संपतांच त्या