पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सातवें : २२१

पंडितजींना मान्य नाही. दुसऱ्या कोणी तत्त्वांचा दुरुपयोग केला किंवा असत्याचरण केलें तरी आपण तत्त्वनिष्ठ, सत्यनिष्ठ राहिलों की आपल्याला जय निश्चित मिळेल अशी त्यांची श्रद्धा आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यांत त्याच पुण्यामुळे आपण विजयी झालों असें त्यांचें मत असल्याचें वर सांगितलेंच आहे.
 अशी तत्त्वनिष्ठा असल्यामुळेच आज स्वातंत्र्यलढ्याच्याहि एक पाऊल पुढे पंडितजींनी टाकलेलें दिसतें. स्वातंत्र्यलढ्यांत भारत शत्रूचा अहिंसेने का होईना पण प्रतिकार करीत होता, पण आता शत्रूंना केवळ प्रेमाने, निर्भेळ प्रेमाने जिंकण्याचा प्रयोग चालू झाला आहे. पाकिस्तान भारताचा नित्य अवमान करीत आहे, सरहद्दींचा भंग करीत आहे, आपल्या स्त्रिया, आपले अधिकारी यांना पळवीत आहे. चीनने तर १२००० चौरस मैलांचा मुलूखच आक्रमिला आहे. पण या दोन्ही देशांवर पंडितजींचें निरपेक्ष प्रेम आहे. शुक्लानगरमध्ये भाषण करतांना त्यांनी त्याचा सुंदर आविष्कार केला आहे. चीन-हिंदुस्थान वाटाघाटींचा उल्लेख करतांना 'दोन महान् राष्ट्र शांततेने चर्चा करीत आहेत' असे ते म्हणाले. मीरत येथे भाषण करतांना चीन-भारताच्या दोन हजार वर्षांच्या मैत्रीचें त्यांनी हृदयंगम वर्णन केलें. चीन मात्र भारताची पावलोपावली मानखंडना करीत आहे. तरी त्याच्याविषयी भारताची प्रेमभावना कायम आहे. निरपेक्ष प्रेम तें हेंच. हीच भावना पाकिस्तानविषयीहि आहे. त्याच्याविषयी प्रखर शब्दांत बोलणें पंडितजींना मान्य नाही. आपले पूर्वीचे स्नेहसंबंध आहेत, स्वातंत्र्यलढ्यात आपण खांद्याला खांदा लावून लढलों आहोंत हें आपल्याला विसरणें शक्य नाही. शेवटीं पंडितजी म्हणाले की, 'जगांतल्या कोणत्याहि राष्ट्राविषयी आमच्या मनांत शत्रुभाव नाही. चीन, पाकिस्तान यांच्याविषयीहि नाही.' शत्रूला प्रेमाने जिंकण्याचा हा प्रयोग स्वातंत्र्यलढ्यापेक्षा निःसंशय वरच्या दर्जाचा आहे !
 आणखीहि एका बाबतीत आपली प्रगति झालेली आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी आपल्याला देश मुक्त करण्याची घाई झाली होती. हिंदु-मुसलमानांच्या ऐक्यावांचून स्वातंत्र्य नाही हें गांधीजींचें प्रियतत्व. पण तेंहि त्यांनी सोडलें, आणि 'करा वा मरा' असा संदेश देऊन अंतिम संग्राम त्यांनी सुरू केला.