पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२ : लोकसत्तेला दण्डसतेचे आव्हान


रशियाच्या या प्रगतीमुळे डळमळू लागला. त्या वेळी पाश्चात्य जगांतील पंडितांनी याविषयीच्या निरनिराळ्या उपपत्ति मांडल्या; त्यांतली प्रमुख अशी की, जर्मनीचा पराभव झाल्यानंतर रशियाला जर्मनींत जर्मन शास्त्रज्ञांचे संशोधनाचे सर्व कागदपत्र सापडले; ते त्याने पळविले आणि त्या बरोबरच अनेक नामांकित जर्मन शास्त्रज्ञांनाहि त्याने पळवून नेलें; रशियाने विज्ञानक्षेत्रांत जी प्रगति केली तिचे श्रेय अशा रीतीने जर्मन शास्त्रज्ञांना आहे, सोव्हिएट शास्त्रज्ञांना नाही. हा समज अत्यंत भ्रामक व हास्यास्पद असा आहे. समाजाची पातळी उंचावलेली नसतांना, विज्ञानाचे वातावरण निर्माण झाले नसतांना, असे उसने शास्त्रज्ञ आणून एवढी अभूतपूर्वं प्रगति एखाद्या देशाला करतां येईल हे सर्वथा अशक्य आहे. याविषयी निकोलाय गॉले या लेखकाने फार चांगले विवेचन करून या भ्रमाचा निरास केला आहे. ['इन्स्टिट्यूट फॉर दि स्टडी ऑफ दि यू. एस्. एस्. आर.' या नांवाची म्युनिच (जर्मनी) येथे एक संस्था आहे. सोव्हिएट रशियांतून निर्वासित झालेले शास्त्रज्ञ व पंडित यांनी ही स्थापिली आहे. कोणीहि निर्वासित तिचा सभासद होऊं शकतो. मात्र तो कम्युनिस्ट वा कम्युनिस्टमित्र असतां कामा नये असा संस्थेचा नियम आहे. सोव्हिएट रशियाचा सर्वांगीण अभ्यास हेंच तिचे उद्दिष्ट असून दरमहा ती सुमारें ४८ पानांची एक पुस्तिका प्रसिद्ध करते. या पुस्तिकांतून येथे बरीच माहिती घेतलेली आहे.] 'लोकायत्त समाज व दण्डायत्त समाज यांतील विज्ञानाची प्रगति' हा निकोलाय गॉले याचा लेख नोव्हेंबर १९५७ च्या पुस्तिकेंत आहे. गॉले म्हणतो की, 'जर्मन शास्त्रज्ञांचे संशोधनाचे कागद रशियाने नेले हें खरें. पण एवढयावरून स्पुटनिकचें, रॉकेटचें व नव्या लांब पल्ल्याच्या अस्त्रांचे श्रेय जर्मनांना देता येईल असे नाही. तसें म्हटलें तर जर्मन शास्त्रज्ञ अमेरिकेतहि गेले आहेत, आणि अमेरिकेत गेलेले ब्राऊन, बर्जर व डॉ. ले हेच या शास्त्रांतले प्रमुख संशोधक होते. रशियांत गेले ते यांचे दुय्यम लोक होत. दुसरी गोष्ट अशी की, या विषयांचे संशोधन रशियांत १९१७ पूर्वीच झारशाहींत चालू झाले असून पहिल्या महायुद्धांत जर्मनांनी मेशखेरस्की, चॅपलिगीन व झिऑलव्होस्की या रशियन शास्त्रज्ञांचे सिद्धान्तच वापरले होते. रशियाची या बाबतींतली क्रान्तीपूर्वीची परंपरा मोठी