पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

दोस्तराष्ट्र संघटना निर्मावी हें त्यांना मंजूर नाही. भारताचे असामान्यत्व आहे तें यांतच आहे ! सत्तालोभासाठी तत्व सोडावयाचें, पण राष्ट्रासाठी नाही.

सगुण साकार, सान्त होणे आवश्यक

 ब्रिटन हे अतिबलाढ्य राष्ट्र आहे. त्याच्याशी लढा करून आपण स्वातंत्र्य मिळविले हा अभिमान आपण बाळगतों. त्याचे परराष्ट्रमंत्री सेल्विन लॉईड यांनी या संबंधांत जे विचार मांडले आहेत ते आपल्याला उद्बोधक होतील असें वाटल्यावरून पुढे देतों. ते म्हणतात, "कम्युनिस्ट सत्तेला तोंड द्यावयाचें तर पश्चिमेने संघटित राहिलेच पाहिजे. विशेषतः ब्रिटन व अमेरिका हे आता इतके परस्परावलंबी झाले आहेत की, त्यांना विभक्ततेचा, भिन्न मार्गांचा विचार करणेच शक्य नाही. आपल्या स्वतंत्र व निःपक्ष परराष्ट्रीय धोरणाची खूण म्हणून त्यांनी कांही किरकोळ मतभेद व्यक्त केले तरी चालेल. पण मूलगामी मतभेद, किंवा पूर्णतया स्वतंत्र धोरण हा अद्भुत श्रीमंती विलास आता आपल्याला परवडणार नाही. आपण एकाकी राहिलों तर सर्वनाश ओढवेल. आपला पक्ष न्याय्य आहे, सत्य आहे, शुद्ध आहे, म्हणून आपल्याला जय मिळेल हा भ्रम आहे. हें सर्व असूनहि आपला केव्हाही पराभव होऊ शकेल. आपण संघटित राहिलों, स्वतःचे देश समर्थ केले, आणि सर्व अर्वाचीन साधनांनी जगांतल्या देशांशी दृढसंबंध जोडले तरच आपल्याला यश येईल." (रीडर्स डायजेस्ट- मे १९५९). जो श्रीमंती विलास ब्रिटन-अमेरिका यांसारख्या धनाढ्य व बलाढ्य राष्ट्रांना परवडणार नाही, तो भारताला परवडेल असें पंडितजींना कां बरें वाटतें ? त्यांची सत्तत्त्वांवरची अढळ श्रद्धा हें त्याचें कारण होय. तेहरानच्या २२ सप्टेंबर १९५९ च्या मुलाखतीत त्यांनी हेंच सांगितलें. 'चीन- प्रकरणानंतर आपलें सहजीवनाविषयी आता काय मत आहे?' असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर ते म्हणाले की, 'त्यांत यामुळे अणुमात्र फरक झालेला नाही. एखाद्या देशाने त्याचा दुरुपयोग केला किंवा एखादा त्याप्रमाणे वागला नाही तरी सहजीवनाच्या तत्त्वाला बाध येत नाही. तत्त्व हे केव्हाहि तत्त्वच; कोणी असत्य बोलला तरी सत्य तें सत्यच.' (टाइम्स ऑफ इंडिया, २३ सप्टेंबर १९५९) याचा अर्थ असा की, सेल्विन लॉइडचें मत