पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सातवें : २१९

असा अर्थ होतो. युद्धाचा प्रसंग उद्भवला तर आपल्याला मित्र कोण या दृष्टीने हा विचार केला आहे. एरवी सर्व जगाशीं आपण मैत्री जोडूं शकूं हें खरें आहे; पण ती शिळोप्याची मैत्री होय. मरण-मारणाच्या संग्रामांत कोणी राष्ट्र आपले मित्र आहे का असें पाहिलें तर तशी मैत्री आम्हांला जोडावयाचीच नाही असें त्या मुलाखतींत पंडितजींनी जाहीर केलें आहे. लष्करी करार, लष्करी दृष्टीने दोस्ती कोणाशींहि करावयाची नाही असा दृढनिश्चय त्यांनी बोलून दाखविला आहे. लोकांना मित्र हवे असतात ते प्रसंगी आपल्या बाजूस सज्ज राहणारे हवे असतात, आणि स्नेह केला तर संपूर्ण करावा अशी त्यांची अपेक्षा असते. आपल्या न्याय-अन्यायावर जगाच्या चावडीवर टीका करणारा मित्र कोणालाहि नको असतो. जें आपण करूं त्याचें समर्थन करणाराच मित्र सर्व राष्ट्रांना हवा असतो. निदान त्याने अप्रिय गोष्टींत मौन पाळावे अशी अपेक्षा असते. हे प्राणपणाचे, मरण-मारणाचे प्रसंग असतात. तेथे जिवाला जीव देणारा मित्र हवा असतो. न्यायपीठावर आरोहण करणारा मित्र हा त्यांच्या दृष्टीने मित्रच नव्हे. तुल्यरागद्वेष, समशत्रुमित्र यावांचून संघटना टिकत नाहीत. प्रसंगी मित्रराष्ट्राच्या असत्यावर अन्याय्य कृत्यांवर पांघरूण घालणेंहि अवश्य असतें. त्याचे समर्थन करणेंहि अवश्य असतें. या अपूर्ण जगांत यावांचून कोणाचें चालत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांना हें तत्त्व अक्षरशः मान्य आहे, पण तें अंतर्गत राजकारणांत काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या वेळी काँग्रेसश्रेष्ठींनी एकदा निर्णय केला की, प्रत्येक काँग्रेसजनाने त्याचें समर्थन केलेच पाहिजे, मग तो निर्णय त्यांना अन्याय्य वाटो, असत्य वाटो, कसाहि वाटो. तसें समर्थन त्याने केलें नाही तर निदान त्याने मौन पाळलें पाहिजे. त्यामुळे तो दूरचा होईलच; पण त्याची हकालपट्टी होणार नाही. त्याने निःपक्ष धोरण अवलंबिलें तर मात्र त्याला काँग्रेसपक्षांत जागा नाही. मतस्वातंत्र्याचा अधिकार काँग्रेसमध्ये दिला जात नाही, याचें कारण हेंच. त्यावांचून संघटना टिकणार नाही. म्हणून आपली विवेकदेवता, आपली सत्यनिष्ठा तेथे सभासदांनी बाजूस ठेवलीच पाहिजे असा काँग्रेसचा दंडक आहे. पण हेंच तत्व भारताने परराष्ट्रीय धोरणांत अवलंबावें हें मात्र पंडितजींना मान्य नाही. भारत बलाढ्य करण्यासाठी लष्करी करार करून