पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

तत्त्वें हीं परस्परव्यवच्छेदक आहेत. त्यांच्यांत शांततामय सहजीवन कालत्रयी शक्य नाही." रशिया व चीन यांच्या मतें भारत हा साम्राज्यवादी व भांडवली देश आहे हें मागे सांगितलेच आहे व तें जगजाहीर आहे. अशा स्थितीत आपण पक्षातीत आहों अशा घोषणांनी युद्ध टळणार कसें ? जो कम्युनिस्ट नाही तो निश्चित शत्रुपक्षांतला होय हें दण्डसत्तांचें निश्चित धोरण आहे.

युद्ध दाराशी आले आहे

 ज्याला शांततारक्षणाचे महत्त्व वाटतें त्याने प्रथम स्वतः बलाढ्य व सामर्थ्यसंपन्न होण्याचा प्रयत्न करणें हेंच त्याचें कर्तव्य होय. जगांत भारतासारखें दुबळें राष्ट्र असणें हेंच खरें युद्धाचें कारण असतें. ज्याला आत्मसंरक्षणहि करतां येत नाही, कोणीहि लचके तोडले तरी ज्याला यशस्वी प्रतिकार करतां येत नाही, जेथील कोट्यवधि प्रजा नित्य भुकेली आहे अशा राष्ट्रांवरच सर्वांचा डोळा असतो. अनेकांना तें एक भक्ष्य वाटते आणि त्यामुळेच लढाई उद्भवते. तेव्हा कोठल्यातरी मित्रसंघाच्या साह्याने बलसंपन्न होणे हाच शांतता रक्षिण्याचा खरा मार्ग होय. आपण लोकवादी मित्रसंघांत समाविष्ट झालो असतो तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स, पश्चिम जर्मनी व भारत यांचा वर सांगितल्याप्रमाणे एक बलाढ्य संघ झाला असता आणि हें एकवटलेलें सामर्थ्य कोणत्याहि प्रतिपक्षाला भारी ठरून युद्धाचा संभव निश्चितच टळला असता. शिवाय यामुळे भारताला अवश्य तें सर्व आर्थिक, लष्करी व वैज्ञानिक साह्य मिळून तोहि बलशाली झाला असता, पण आपल्या स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणामुळे आज आपल्याला कोणीहि मित्र राहिलेला नाही आणि युद्धाचा संभव वाढलाच आहे. युद्ध आपल्या दाराशी आले आहे.
 पण अजूनहि कोणत्याहि विशिष्ट पक्षांत सामील व्हावयाचें नाही हा पंडितजींचा निश्चय कायम आहे. १९५९ सालाच्या सप्टेंबर २२ तारखेच्या तेहरानच्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलें आहे. आमचें सर्वच राष्ट्रांशी स्नेहसंबंध जोडण्याचें धोरण आहे. त्यांत चीन प्रकरणामुळे बदल झालेला नाही, असे ते म्हणाले. पण व्यवहारांत सर्वांशी मैत्री म्हणजे कोणाशींच मैत्री नव्हे