पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१६ : लोकसत्तेला दण्ड सत्तेचे आव्हान

निःशस्त्र प्रतिकार यांचा विचारहि आपण केलेला नाही. तो मार्ग स्वातंत्र्य- लढ्यांत जसा यशस्वी झाला तसाच येथेहि होईल अशी श्रद्धा असेल तर आपण का थांबलो आहोत हें सांगणे कठीणच आहे. अमेरिकेत पंडितजींनी साधनशुद्धीचे महत्त्व सांगितलें त्या वेळीं तेथे याच शंका लोकांनी प्रदर्शित केल्या. 'न्यूयॉर्क टाइम्स' म्हणाला की, 'गांधींच्या शिष्याने निःशस्त्र प्रतिकारावर श्रद्धा ठेवावी हे युक्तच आहे, पण पाकिस्तानपुढे तो चालत नाही असें दिसत असूनहि सोव्हिएट युनियनपुढे तो चालेल असे त्यांनी मानणें हें समजूं शकत नाही.' हे अवतरण देऊन श्री. करुणाकरन् पुढे म्हणतात की, "अहिंसा-मार्गाच्या खऱ्या अडचणी दिसतात त्या भारताच्या अंतर्गत राजकारणांत. स्वातंत्र्यानंतर येथे अनेक चळवळी झाल्या त्या वेळी केन्द्र सरकारचे व राज्यसरकारचे अधिकारी ब्रिटिशांप्रमाणेच वागले. आपल्या सरकारने राजकारणी चळवळ्यांवर वरचेवर गोळीबार केला आहे आणि कधी कधी तर तुरुंगांतल्या कैद्यांवरहि गोळीबार केला आहे." (इंडिया इन् वर्ल्ड अफेअर्स, पृ. २५)
 मला अशी आशा आहे की, सध्या भारताने चीनशीं ज्या वाटाघाटी चालविल्या आहेत त्या केवळ नाइलाजाने, आज लढाईची कसलीहि तयारी आपल्याजवळ नाही म्हणून चालविल्या आहेत असें पंडितजी मानीत असतील; पण तसे नसेल आणि लष्करी सामर्थ्य असूनहि भारत सरकार साधनशुद्धीचा अवलंब करीत असेल तर आपलें मोठें विपरीत वर्तन घडत आहे असें ठरेल. त्याचप्रमाणे भारतांतील व्यापारी, भांडवलदार, कारखानदार व इतर धनिक हे साठे करून, अनीति आचरून, कर चुकवून अन्नधान्य, साखर, रॉकेल या बाबतीत सरकारच्या सर्व योजनांचा विचका करीत आहेत, जनतेला पिळून काढीत आहेत (असें सरकारच म्हणत आहे); पण वाटाघाटीच्या मार्गाने त्यांच्यावर नियंत्रण घालणें हें सुद्धा सरकारला आज बारा वर्षांत शक्य झालेले नाही. हे लोक सर्वस्वी सरकारच्या अधीन, निःशस्त्र व कायद्याच्या कक्षेतले असून त्यांच्या बाबतीत जो मार्ग यशस्वी होत नाही तो चीनच्या बाबतीत यशस्वी होईल असें भारत सरकार मानीत असले तर आपण खरोखरच मोठ्या अद्भुतरम्य वातावरणांत आहोंत व आपला ध्येयवाद राष्ट्राचें हिताहित न पाहण्याइतक्या पराकोटीला गेलेला आहे असें म्हणावें लागेल.