पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सातवें : २१५

होते. इंग्रज सत्ताधाऱ्यांनी हे स्पष्टपणे मान्य करूनच आपले धोरण आखले. तेव्हा आपण प्रेमाने, आत्मक्लेशाने इंग्रजांचे हृदयपरिवर्तन केलें म्हणून त्यांनी स्वराज्य दिलें हें सत्य नाही. दुसरी गोष्ट अशी की, पंचवीस-तीस वर्षे निःशस्त्र प्रतिकाराची- सत्याग्रहाची नव्हे- चळवळ आपल्याला करतां आली याचें श्रेय जितके आपल्याला, तितकेंच इंग्रजांच्या सौम्य वृत्तीला आहे हे लक्षांत घेतलें पाहिजे. जगांतल्या दुसऱ्या कोणत्याहि देशाने एक दिवसहि ही चळवळ चालू दिली नसती. पोर्तुगीजांनी पहिल्याच दिवशी गोळया घातल्या आणि आपली चळवळ पहिल्याच दिवशीं थांबविली. इंग्रज सत्ताधारी सौम्यवृत्तीने वागले नसते तर भारताच्या निःशस्त्रप्रतिकाराचें हेंच झालें असतें. शेवटचा लढा किंवा स्वातंत्र्याचे पुढे होणारे एक-दोन लष्करी लढे टळले, तेहि इंग्रजांच्या विवेकशीलतेमुळे, म्हणजे त्यांचा स्वार्थ शहाणा असल्यामुळे टळले. जपान, जर्मनी, रशिया हे हिंदुस्थानचे सत्ताधारी असते तर प्रत्यक्ष घनघोर संग्राम झाल्यावांचून आपल्याला स्वातंत्र्य मिळालें नसतें. सत्याग्रहामुळे येथे विजय मिळाला नसता इतकेंच नव्हे तर एक दिवसाच्यावर सत्याग्रह चाललाच नसता.

या पराकोटीस ध्येयवाद गेला आहे

 वर पंडितजींच्या अमेरिकेतील भाषणांतील जो उतारा दिला आहे त्यांत त्यांनीहि हें मान्य केलें आहे. आमच्या विजयाचे श्रेय दोन्ही पक्षांना आहे असे ते म्हणतात. दुसरे असे की, स्वातंत्र्यानंतर आपल्या साधनशुद्धीची व उदात्त तत्त्वांची अनेक वेळा परीक्षा होऊन आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग तेथे कुचकामाचा ठरला आहे. गोव्याचा उल्लेख वर आलाच आहे. काश्मीरवर पाकिस्तानने आक्रमण केले तेव्हा आपण लष्करी सामर्थ्याचाच उपयोग केला आणि तोहि गांधीजींच्या संमतीने! काश्मीरचा बाकीचा निम्मा भाग त्या वेळी सहज सोडवितां आला असता, पण तो आपण कांही उदात्त न्यायबुद्धीने सोडविला नाही. आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या मार्गाने अजूनहि आपल्याला तो सोडवितां आलेला नाही. हैदराबादचें प्रकरण लष्करी बळानेच सोडवावें लागलें, आणि आता पाकिस्तानचे व चीनचे आक्रमण येऊनहि बरेच दिवस झाले. आपण फक्त पत्र लिहीत आहों! सत्याग्रह किंवा