पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

आग्रह शेवटी सत्याच्याच विटंबनेला कारण होतो; पण भारतांत नेहमी हेंच घडत असतें. येथे जमिनीवरून चालायला कोणी तयारच नाही. 'आपल्या परराष्ट्रकारणाचा गांधीप्रणीत सत्यअहिंसा हाच पाया आहे.' असें पंडितजींनी अनेक वेळां सांगितलें आहे, आणि आपले पक्षातीत स्वतंत्र धोरण सोडून कोठल्यातरी मित्रसंघांत सामील होण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही याचें कारण हेंच आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठांत पंडितजींनी जें भाषण केलें त्यांत हा विचार त्यांनी स्पष्टपणे मांडलेला आहे. ते म्हणाले, "साध्य व साधन हीं अविभाज्य आहेत. त्यांत भेद करताच येत नाही. महात्माजींनी आम्हांला हेंच शिकविलें आहे. साध्यापेक्षा साधनांना कधीहि गौण लेखूं नका, असें ते आम्हांला नेहमी बजावीत असत. पंचवीस तीस वर्षे एका अत्यंत प्रबळ राष्ट्राशी लढा करून आम्ही विजयी झालों. त्या लढ्याचें मुख्य वैशिष्ट्य साधनशुद्धि हेंच होतें. अर्थात्, याचें श्रेय दोन्ही पक्षांना आहे; पण स्वातंत्र्यलढ्यांत आम्हांला जें यश मिळाले त्यावरून लष्करी सामर्थ्य हेंच दर वेळीं निर्णायक ठरतें असें नाही आणि ज्या साधनांनी आपण लढा जिंकतों त्यांनाच सर्वस्वीं महत्त्व आहे, हे उघड दिसतें." कोठल्या तरी देशाच्या मित्रसंघांत सामील होण्याचा प्रधान हेतु आत्मरक्षण हाच असतो, पण भारताला अशा मित्रसंघाच्या लष्करी सामर्थ्याची गरजच नाही. कारण आपण साधनशुद्धीच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने राष्ट्ररक्षण करणार आहों ! आपलें परराष्ट्रीय धोरण आपण स्वतंत्र ठेवलें आहे त्याच्या मागची भूमिका ही आहे. राष्ट्ररक्षणासाठी आपल्याला कोणाच्याहि साह्याची गरज नाही.
 ही भूमिका किती अवास्तव आहे हे थोड्या विचाराअंती कोणाच्याहि ध्यानांत येईल. भारताने इंग्रजांशी लढून स्वातंत्र्य मिळविलें तें सत्याग्रहाने, अहिंसामार्गाने मिळविलें, हा भ्रम आपण जितक्या लवकर सोडून देऊ तितकी आपली उन्नति लवकर होईल. या मार्गाने लोकजागृति झाली यांत शंकाच नाही; पण अंतीं सुभाषचंद्रजींच्या लष्करी उठावामुळे जागृति सैन्यापर्यंत जाऊन पोचली, आणि आता लष्करी सामर्थ्याने हिंदुस्थान ताब्यांत ठेवता येणार नाही, हें इंग्रजांच्या ध्यानांत आलें, म्हणून त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिले, असा इतिहास आहे. शेवटीं नाविकदलांत प्रत्यक्ष बंड झालेच