पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सातवें : २१३

राष्ट्राच्या राजकारणांत असा खेळ करण्याचा कोणालाहि अधिकार नाही. उदात्त ध्येयासाठी व्यक्तीला हालअपेष्टा, यातना, सोसाव्या लागल्या तर तिचें जीवन त्यांनी उजळून निघतें. राष्ट्राच्या जीवनाचें तसें नाही. राष्ट्राला व्यवहारी राजकारणासाठी लढणें हें स्वाभिमानाचें वाटतें. त्यांतली उदात्तता त्याला कळते, म्हणून त्या त्यागाने त्याचें जीवन सार्थकी लागतें; पण परराष्ट्राचें आक्रमण होत असतांनाहि बुद्धाप्रमाणे, किंवा जीझस्प्रमाणे किंवा एकनाथाप्रमाणे सत्याने असत्य जिंकणें, अहिंसेने हिंसा जिंकणें ही कल्पना अखिल समाजाला पेलत नाही, समजत नाही; आणि मग यातना, कष्ट, मरण एवढेच शिल्लक राहतें. असल्या आपत्तींनी व्यक्तीचें मन जास्तच समर्थ बनतें. आपण या यातना समाजासाठी, ध्येयासाठी सोशीत आहों या जाणिवेने त्याची पातळी उंचावते, पण समाजाला हें समाधान कधीच नसतें. पाकिस्तानने गोळीबार केला, स्त्रिया पळविल्या, तरीहि शांत राहणे यांतली उदात्तता त्याला समजूं शकत नाही, आणि मग अशा स्थितीत या घटनेतला अवमान, मानहानि, लाचारी, हीनता, असहायता, निराशा एवढेच त्याच्या वाट्याला येतें, आणि यामुळे मनाचा कमालीचा अधःपात होता. जो ध्येयवाद, जी सत्यनिष्ठा संतांच्या वैयक्तिक जीवनांत मन विशाल व समर्थ करण्यास कारणीभूत होते तो आत्यंतिक ध्येयवाद व ती सत्यनिष्ठा समाजाच्या मनःशक्तींच्या ऱ्हासाला कारण होत असते. म्हणून राष्ट्राला ध्येयवाद शिकवावयाचा तो व्यवहारसिद्ध, राष्ट्राच्या स्वार्थाशी स्पष्टपणें निगडित असलेला, बहुजनांच्या भावनांना आवाहन करणारा व बुद्धीला पेलणारा असला पाहिजे.

जमिनीवरून चालण्यास तयारी नाही

 जगाची शांति, मानवहित, साध्याइतकेंच साधनाला महत्त्व देणारें तत्वज्ञान हें राष्ट्रीय प्रपंचांत जर लादले गेलें तर समाजाचा नाश झाल्याखेरीज राहणार नाही. सत्य हें अतिरेकाला नेलें की, या जगाच्या व्यवहारांत निश्चित पराभूत होतें. जमिनीवरून चालण्याचें नाकारून समाजाने अखिल राष्ट्राने (आणि तेंहि राजकारणाच्या क्षेत्रांत) आकाशांतून विहार करण्याचें ठरविले की, जमिनीच्या खाली त्याला जावें लागतें. सत्याचा अतिरिक्त