पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

जाणावें की, हें राष्ट्रीय प्रपंचांतील ध्येयवादाविषयीं लिहिलें आहे. वैयक्तिक ध्येयवादाविषयी नाही. त्या जीवनांत व्यक्ति जेवढा उदात्त ध्येयवाद आचरील तेवढा हवाच आहे. सत्य, अहिंसा, न्याय यांसाठी जेवढा त्याग व्यक्ति करील तेवढा कमीच आहे. तेथेहि व्यक्तीने व्यवहार पाहावा; पण तो न पाहतां बेशक आत्मबलिदान केलें तरी तें समाजाला हितावहच होते. जगाचा इतिहास दधीचि, गौतम बुद्ध, सॉक्रेटिस, जीझस यांच्या बेहिशेबी, त्यागानेच उजळलेला आहे. कोलंबस, लिंडबर्ग यांच्या अव्यवहार्य साहसानेच संपन्न झाला आहे. पण अखिल राष्ट्राच्या राजकारणांत उदात्तता, पूर्ण सत्य पूर्ण नीति आणण्याचा प्रयत्न केला तर त्या राष्ट्रांचा नाश झाल्याखेरीज राहणार नाही. महात्माजींनी प्रारंभीच्या काळी तशी वृत्ति ठेविली होती. ला. टिळकांविषयी लिहितांना ते म्हणाले होते की, 'त्यांची व माझी निष्ठा निराळ्या प्रकारची आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी सत्य, नीति यांचा मी त्याग करीन असें टिळक म्हणत; मला मात्र तें मान्य नाही. सत्य-अहिंसेवरील निष्ठा मी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठीहि चळू देणार नाहीं.' पण महात्माजी पुढे वास्तववादी झाले. साधनशुद्धीचा विचार त्यांनी अनेक वेळां झुगारून दिला. देशहितासाठी भांडवलदारांचा (अर्थातच शोषणाने मिळविलेला) पैसा त्यांनी घेतला. निवडणुकी लढवितांना सत्याला वाटेल ती मुरड घालण्यास त्यांनी मान्यता दिली. १९२२ च्या बार्डोलीच्या लढ्याच्या वेळीं चौरीचुऱ्याला दंगा झाला म्हणून हिंसेच्या भयाने त्यांनी माघार घेतली होती; पण १९४२ सालीं आता तो विचार मी करणार नाहीं, स्वातंत्र्य हेंच माझें ध्येय असें जाहीर करून ते टिळकपंथी झाले; आणि सर्वांत विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा लढा म्हणजे सत्याग्रह नाही, तो निःशस्त्रप्रतिकार आहे, कारण त्यांत इंग्रजांवर प्रेम कोणाचेंच नव्हते, त्यांचे हृदयपरिवर्तन होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, हें दिसत असूनहि त्यांनी सत्याग्रहच झाला पाहिजे, प्रेमानेच इंग्रजांना जिंकले पाहिजे असा आग्रह धरला नाही. असा वास्तवाचा अवलंब त्यांनी केला म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळालें, आणि तसा यापुढे आपण केला तरच तें स्वातंत्र्य टिकेल. इतिहासाची अशीच साक्ष आहे. व्यक्तीने अव्यवहारी, अवास्तव दृष्टि ठेवून उदात्त तत्त्वासाठी वाटेल तो त्याग करावा; पण