पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सातवें : २११

विहार करीत राहिल्यामुळे आज आपली स्थिति काय झाली आहे पाहा. पाकिस्तानाने आपल्या देशावर आक्रमण केलें आहे, आपलों गांवें बळकाविलीं आहेत, स्त्रिया पळविल्या आहेत व नित्य गोळीबार चालविला आहे. चीननेहि आक्रमण केले आहे. आपल्या हद्दींत रस्ते बांधले आहेत ! तरी हें आक्रमण नाही, किरकोळ गोष्ट आहे असें भारतीयांना सांगण्याची आपल्या नेत्यांवर पाळी आली आहे. मागे काश्मीरवर आक्रमण झालें तर भारतावर झालें असें समजूं असें पंडितजींनी पाकिस्तानला बजावलें होतें. आता भारतावर प्रत्यक्ष आक्रमण झाले तरी तें मोठे आक्रमण नाही, तुम्ही शांत राहा, असें स्वत:च्या जनतेला ते बजावीत आहेत. अतिरिक्त ध्येयवादाने शेवटी हीच शोचनीय अवस्था प्राप्त होते असा इतिहासाचा निर्वाळा आहे. पूर्ण ब्रह्मचर्य पाळण्याच्या प्रतिज्ञा करून मठांत राहणान्या बौद्ध भिक्षु-भिक्षुणींची आणि ख्रिस्ती बिशप व नन यांची काय स्थिति झाली हे जगजाहीर आहे. रणामध्ये कुटिल नीति वापरावयाची नाही, समोरा-समोर लढावयाचें, मुत्सद्देगिरीनेहि माघार घ्यावयाची नाही, प्रसंग आला तर धारातीर्थी सर्वांनी देह ठेवावयाचे व स्त्रियांनी जोहार करावयाचा हा रजपुतांचा उदात्त ध्येयवाद होता, पण यामुळे राजस्थानातील प्रत्येक घराण्याला शेवटी मोगलांपुढे नमावें लागलें आणि मुलगी बादशाहांना देणें भाग पडले. आश्चर्य असे की, हे रजपूत आपसांत वागतांना, रजपूत संघटना करण्यासाठी कधीहि ध्येयवादाने वागले नाहीत. त्यांचा ध्येयवाद फक्त परक्याशी वागतांना ! तीच आपली आज स्थिति झाली आहे. आक्रमकांशी वागतांना पंचशील, साधनशुद्धि, जगाने गौरव करावा अशी शांति- म्हणजे परराष्ट्रनीतींत पूर्ण अहिंसा आणि स्वदेशांतील जनतेवर रोज तीन वेळां गोळीबार ! संयुक्त महाराष्ट्रवाद्यांवर गोळीबार, महागुजराथवाद्यांवर गोळीबार, विद्यार्थ्यांवर गोळीबार, कामगारांच्यावर गोळीबार, घरांत घुसून गोळीबार ! ठार मारण्याच्या हेतूनेच गोळीबार ! पण ही स्थिति अपरिहार्य आहे. परिस्थितीचा, निसर्गाचा हा अत्यंत कठोर नियम आहे. राष्ट्राचे राजकारण हा अगदी जड, व्यावहारिक, स्थार्थनिष्ठ खेळ आहे. तेथे कोणी उदात्त ध्येयवादाचा आश्रय केला तर तो ध्येयवाद तर अपयशी होतोच, पण सामान्य व्यावहारिक यशहि त्यांच्या हातून निसटून जाते. वाचकांनी