पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिले : ११

त्यांनी केला आहे. या पद्धतींत व्यक्तित्व मुरगळून टाकलें जातें हे त्यांना मान्य आहे; पण शिक्षणाचा प्रसार ही एक शृंखलाछेदक शक्ति आहे आणि अंती ती व्यक्तित्वावरची बंधनें नष्ट केल्याखेरीज राहणार नाही असा अभिप्राय त्यांनी प्रकट केला आहे. (टाइम्स २५- ८- ५८).

अमेरिकेचा पराभव

 भविष्यकाळी काय होईल हें सांगणे कठीण म्हणून सोडून दिलें तरी आजचें रशियाचें सामर्थ्य कशांत आहे याचा अवगम वरील माहितीवरून आपणांस निश्चित होईल. औद्योगीकरण आणि शास्त्रीय ज्ञान हेंच त्याच्या सामर्थ्याचें रहस्य आहे. म्हणजे पाश्चात्य जगाने सामर्थ्यासाठी ज्या देवतांची उपासना केली त्यांचीच रशियाने केली आहे. तो रानटी असला तरी तो या क्षेत्रांत नव्हे. या क्षेत्रांत त्याने अगदी अद्ययावत् शास्त्रीय ज्ञानात पाश्चात्यांची बरोबरी केली आहे इतकेंच नव्हे, तर त्यांच्यावर मात केली आहे हें त्याच्या यशस्वी स्पुटनिक- भ्रमणावरून दिसून येईल. अमेरिकन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ, हैड्रोजन बाँबचा जनक एडवर्ड टेलर याने, रशियाने आकाशांत बालचंद्र सोडल्यानंतर असे उद्गार काढले की, "विज्ञानक्षेत्रांत रशियाने अमेरिकेचा केलेला पराभव पर्ल हार्बरपेक्षाहि जास्त घातक आहे, आणि अमेरिकेला सोव्हिएट रशियाची बरोबरी करावयास किती काळ लागेल हें सांगणे कठीण आहे." १९५७ च्या डिसेंबरांत नाटोची जी परिषद् झाली तीमध्ये लोकांच्या मनांत हीच चिंता व्यक्त झाली. हरप्रयत्न करून या बाबतींत आपण अंतर काटले पाहिजे असा ठराव त्या वेळी परिषदेने संमत केला.

विज्ञान परपुष्ट नाही

 सोव्हिएट शास्त्रज्ञांनी पाश्चात्त्य व विशेषतः अमेरिकन शास्त्रज्ञांवर मात केली हें पाहून व्यक्तिस्वातंत्र्यवादी लोकायत पाश्चात्त्य समाजाला धक्काच बसला. शास्त्राची प्रगति लोकसत्ताक समाजांतच होते, जेथे स्वतंत्र चिंतनाला अवसर नाही, जेथे व्यक्तित्व मारलें जातें तेथे विज्ञानांतील गूढ सत्याचें संशोधन होणे शक्य नाही असा त्यांचा बुद्धिनिश्चय होता. तो सोव्हिएट