पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

म्हणून त्याला साह्य करून, शक्य त्या प्रयत्नाने त्याला लोकवादी पक्षांत स्थिर केला पाहिजे असें त्यांचें मत आहे; आणि हें कशासाठी ? तर अमेरिकन राष्ट्राच्या स्वार्थासाठी ! कांही अमेरिकन सिनेटरांनी हें स्वच्छ शब्दांत सांगितलें आहे. हिंदुस्थानसारखा एक प्रचंड देश जर कम्युनिस्ट झाला तर जगांतल्या लोकशाहीला व मग पर्यायाने अमेरिकेला धोका आहे, म्हणून त्याला साह्य करावयाचें तें अमेरिकेच्या गरजेसाठी अशी त्या दुसऱ्या पक्षाची भूमिका आहे. त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंचीं कांही भाषणें व कांही कृति बोचतात, नाही असें नाही; तरी पण आपल्याला गरज म्हणून हें साह्य करावें असें त्यांचें मत आहे. (इंडिया अँड अमेरिका : पोपलाई व टॅलबॉट- प्रकरण सहावें.) परराष्ट्रीय धोरण ठरवितांना लोक कोणता विचार करतात हें यावरून दिसून येईल. भारतासारख्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या, अप्रगत देशाने ठेवलेलें ताठर धोरण सहन करण्याचें अमेरिकेला वास्तविक कांहीच कारण नाही. तरी या देशाला साह्य करण्यांत आपलाच राष्ट्रीय स्वार्थ आहे हें ध्यानीं घेऊन कृष्ण मेननची भाषणे, नेहरूंचा त्यांना भासत असलेला पक्षपात, चीनविषयीचा आग्रह, अमेरिकेवर होणारी टीका, तिच्या सद्हेतूविषयी घेतलेली शंका हे सर्व विसरण्याची तयारी तेथील मुत्सद्द्यांनी दाखविली आहे, आणि आपण मात्र भारत सर्वस्वी गरजू असतांना, आपला सर्व राष्ट्रीय उत्कर्ष या लोकवादी राष्ट्रांच्या साह्यावर अवलंबून आहे असें दिसत असतांना, सोव्हिएट रशिया व चीन यांचें अंतरंग स्पष्ट दिसून आल्यावरहि आपल्या सार्वभौमत्वावर प्रत्यक्ष आक्रमण झालेलें असतांनाहि, आपल्या परराष्ट्रीय धोरणाची पक्षातीतता म्हणजे जगांतल्या इतर देशांच्या न्याय-अन्यायाविषयी, सत्यासत्याविषयी मधून मधून उदार भाषणे करण्याचें- फक्त भाषणें करण्याचें- आपले स्वातंत्र्य गमाविण्यास तयार नाही. भारतीय जनता दरिद्री राहिली तरी, अवमानित झाली तरी चालेल, पण आम्ही जगांतल्या दलित जनतेचें आश्रयस्थान आहों, शरण्य आहों, पाठीराखे आहों ही उदात्त भूमिका सोडण्यास भारताचे नेते तयार नाहीत. वास्तववाद व अद्भुतरम्य ध्येयवाद यांतील फरक यावरून कळून येईल.
 उदात्त ध्येयवादाच्या अद्भुतरम्य, अवास्तव वातावरणांत गेली १२ वर्षे