पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

पंडित यांनी १९४९ सालींच भारताला अमेरिकेच्या साहाय्याची किती गरज आहे तें एका भाषणांत स्पष्ट केलें होतें. लोकांना अन्नधान्य, वस्त्र आम्हीं दिलें नाही, स्वातंत्र्याचा लढा भारतीयांनी केला त्या वेळी त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पुऱ्या झाल्या नाहीत तर भारतांत कम्युनिझम पसरण्याचा धोका फार मोठा आहे; कारण कम्युनिझम हा गरीब, अप्रगत देशांत लवकर मूळ धरतो; त्या दृष्टीने पाहतां अध्यक्ष ट्रूमन यांचा चतुर्विध कार्यक्रम आशियांतील व हिंदुस्थानांतील कम्युनिझमला पायबंद घालण्यास फार उपयोगी पडेल, असें त्या वेळींच त्यांनी आपले मत व्यक्त केलें होते; पण यावी तशी अमेरिकेची मदत भारताकडे आली नाही. इतर राष्ट्रांना अमेरिकेने मदत दिली त्या मानाने हिंदुस्थानला कांहीच मिळाली नाही. (इंडिया अँड वर्ल्ड अफेअर्स- के. पी. करुणाकरन्, पृष्ठ ४६-४७) आणि याचें कारण म्हणजे आपलें स्वतंत्र परराष्ट्र धोरण ! पंडितजी अमेरिकेत गेले होते त्या वेळी त्यांनी अमेरिकनांना स्वच्छ सांगितले की, आम्हांला गहू हवा आहे, तांत्रिक साह्य हवें आहे, भांडवल हवें आहे; पण यासाठी आम्ही आमचें स्वतंत्र धोरण सोडण्यास तयार नाही.
 पण राजकारण ही देवाणघेवाण आहे. आपले स्वातंत्र्य व सार्वभौमत्व टिकवावयाचे तर प्रत्येक राष्ट्राला मित्रसंघ करावेच लागतात, आणि मित्रसंघ म्हटले की, काही पथ्ये पाळावीच लागतात. संपूर्ण निष्पक्ष व स्वतंत्र परराष्ट्रनीति जगांत कोणत्याहि राष्ट्राला टिकवितां आलेली नाही. यापुढे येणार नाही. इंग्रजांचा राष्ट्रीय स्वाभिमान हा आपल्यापेक्षा कमी नाही, पण दुसऱ्या महायुद्धांत प्रसंग बाका आहे हे ओळखून ब्रिटिशांनी वास्तववादी भूमिका स्वीकारली. हिटलरची एक हजार विमानें रोज ब्रिटनवर अग्निवर्षाव करीत होतीं, आणि लवकरच ब्रिटिश भूमीवर जर्मन सेना उतरणार असा संभव निर्माण झाला होता. त्या वेळीं ब्रिटिशांनी अमेरिकेचा धावा केला, आणि सर्व प्रकारें रूझवेल्ट यांची मर्जी संभाळण्याची कसोशी केली. पुढे रशियावर जर्मनी उलटला त्या वेळी सर्व मानापमान सोडून चर्चिलने मास्कोला खेटे घातले, रशियाने ज्यांच्यावर जुलूम केला होता, आक्रमण केलं होतें त्या दलितांचा कैवार घेऊन त्या काळांत रशियाविरुद्ध भाषण त्याने केलें नाही. आपल्या स्वतंत्र निष्पक्ष परराष्ट्रीय राजकारणाचा बडिवार