पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सातवें : २०७

प्रश्न आहे, तुमच्या देशापुरतें तुम्ही पाहा,' असा अवमानकारक जबाब चीनने दिला. या वर्षी चीनने तिबेट संपूर्ण खालसा केला तेव्हा तेंच घडलें. हंगेरीमधील स्वातंत्र्याचा उठाव रशियाने क्रूरपणें चिरडून टाकला त्या वेळी हेच घडलें. इंडोचायनामध्ये लढा सुरू झाला त्या वेळीं युद्ध थांबविण्याची मागणी प्रथम पंडितजींनी केली. अर्थातच तिचा कांही एक उपयोग झाला नाही. फ्रेंच सेना पराभूत होण्याची वेळ आली त्या वेळींच फ्रान्सने माघार घेतली. या वेळीं इंडोचायनामध्ये प्रथम ठिणगी कम्युनिस्टांनी टाकली, असें अमेरिकेचे त्या वेळचे भारतांतले वकील जॉर्ज ॲलन यांनी पंडितजींच्या निदर्शनास आणले तेव्हा त्यांनी कम्युनिस्टांवर कडक टीका केली, आणि नंतर अमेरिकेचा युद्ध पसरविण्याचा हेतु होता असें दिसतांच त्यांनी अमेरिकेवरहि तशीच प्रखर टीका केली. भारताचे परराष्ट्रीय धोरण स्वतंत्र आहे, निष्पक्ष आहे, हें दाखविण्यासाठी हें उदाहरण नेहमी दिलें जातें. त्यावरून तसें सिद्ध होतें यांत शंकाच नाही, पण त्यामुळे आत्मसंतोषाखेरीज कसलीच प्राप्ति होत नाही. ज्या दलितांच्या, पीडितांच्या बाजूने आपण उभे राहतों त्यांना नुसत्या सहानुभूतीचा कांही उपयोग नसतो; आणि आपण पक्षातीत आहोंत हें मान्य करायला जग एक क्षणभरहि तयार नाही ! आपण कम्युनिस्ट पक्षांत आहों, रशिया चीनचे साथी आहों, असा आपल्यावर अँग्लो-अमेरिकनांचा आरोप आहे; आणि अँग्लो-अमेरिकन पक्षांत आहों, साम्राज्यवादी आहों, हें तर रशिया व चीन रोज दहा वेळा बोलून दाखवितात.

'स्वतंत्र' धोरणाचे दुष्परिणाम
 पण एवढ्यावरच हें भागत नाही. आपल्याला हें आत्मिक समाधान, हा आत्मसंतोष फारच महाग पडतो आहे. कारण जगांतल्या दीनदलितांविषयीची सहानुभूति घोषित करण्यामुळे भारतांतल्या दीनदलितांचा प्रश्न सोडविण्याचें सामर्थ्य आपल्याला प्राप्त होत नाही. मित्रराष्ट्रसंघांत आपण सामील झालो असतों तर भांडवली व लष्करी साह्य आपणांस सध्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त मिळालें असतें आणि आज आपल्याला जी त्या दोन्ही दृष्टींनी दीन दशा आली आहे ती आली नसती. श्रीमती विजयालक्ष्मी